वृत्तसंस्था/ कोलकाता
देशातील श्रीमंत उद्योजक गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने अलीकडेच आणखी एक व्यवसाय आपल्या ताब्यामध्ये चालवायला घेतला आहे. इस्राइलमधील दुसरे सर्वात मोठे बंदर हायफा पोर्ट आपल्या ताब्यामध्ये घेतले आहे. या व्यवहारासाठी अदानी यांनी 94 अब्ज मोजले आहेत.

पुढील 32 वर्षे या बंदरावरचा व्यवहार हा आता अदानी समूहाकडे राहणार असल्याची माहिती आहे. अदानी समूहाने यासंदर्भातला व्यवहार भागीदार गेडॉट यांच्यासोबतीने केला असल्याचेही समजते. याअंतर्गत 70 टक्के हिस्सेदारी अदानी पोर्ट यांच्याकडे तर 30 टक्के इतकी हिस्सेदारी गेडॉट यांच्याकडे राहणार आहे.
महत्त्वाचे बंदर
गेडॉट ही कंपनी इस्राइलमध्ये रसायन आणि लॉजिस्टिक क्षेत्रामध्ये मोठी कंपनी म्हणून नावाजलेली आहे. हायफा बंदर हे इस्राइलमधील व्यापाराच्यादृष्टीने मोठे बंदर मानले जाते. गौतम अदानी यांनी सदरच्या बंदरासाठी बोली लावली होती, ज्यात त्यांना यश आलं आहे.
युरोप, मध्य आशियात संधी
नव्या बंदराच्या ताब्यानंतर अदानी समूहाला युरोप, मध्य आशिया या देशांमध्ये व्यापाराची संधी प्राप्त करता येणार आहे. यासोबतच अदानीला आगामी काळात शांघाई इंटरनॅशनल पोर्ट ग्रुपबरोबर स्पर्धा करावी लागणार आहे. मागच्या वर्षी सदरचे हे बंदर नव्याने सुरू झाले आहे.









