‘कुणी वीज देता का वीज’, असे म्हणण्याची वेळ : ग्रामीण भागात विजेचा खेळखंडोबा सुरूच
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर शहरासह तालुक्यात काही दिवसांपासून वीजपुरवठा खंडित होत असून शहराच्या उपनगरात पुरवठा ठप्प झाला आहे. पश्चिम भागात दहा दिवसांपासून वीजपुरवठा बंदच असल्याने अंधारातच जनतेला जीवन कंठावे लागत आहे. रेशन दुकानांतून रॉकेल पुरवठाही बंद केल्याने शंभर खेडय़ांतील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. हेस्कॉमचे याकडे साफ दुर्लक्ष झाले असून वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत उपाययोजना करण्यात येत नसल्याने तसेच लोकप्रतिनिधी व नेत्यांचेही दुर्लक्ष झाल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. कुणी वीज देता का हो वीज, असे म्हणण्याची वेळ तालुक्यातील जनतेवर आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शहर व उपनगरांत दिवसातून बऱयाच वेळा विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे अनेकांची विद्युत उपकरणे नादुरुस्त होत आहेत. शहर पाणी पुरवठय़ावर परिणाम झाला आहे. शहराच्या काही भागात दोन दिवसांतून एकदा पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शिवाजीनगर, विद्यानगर भागात सलग दोन दिवस वीजपुरवठा बंद होता. त्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. हेस्कॉमकडे वारंवार तक्रारी देऊनही अद्याप या भागात वीजपुरवठा सुरळीत झाला नाही. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. काही ठिकाणी खांब व विद्युतवाहिन्या तुटल्यामुळे वीजपुरवठा बंद आहे. तो सुरळीत करण्याकडे हेस्कॉमचे साफ दुर्लक्ष होत आहे. याबाबत विचारणा करता कर्मचारी कमी असल्याचे संबंधित सांगत आहेत.
तालुक्याच्या पश्चिम भागात तर भयानक स्थिती निर्माण झाली आहे. संपूर्ण पश्चिम भागातील खेडी दहा दिवसांपासून अंधारातच आहेत. रेशन दुकानांतून मिळणारे रॉकेलही गेल्या वर्षभरापासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना आदिवासींचे जीवन जगण्याची वेळ आली आहे. वीजपुरवठा नसल्याने मोबाईल तसेच चार्जिंगचे दिवेही चार्ज होत नसल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. अनेक गावात पावसामुळे खांब पडले आहेत. काही ठिकाणी विद्युतवाहिन्या तुटून वीजपुरवठा खंडित झाला आहे. या भागात पाऊस जोरदार असल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. यासाठी हेस्कॉमने तातडीने वीजपुरवठा सुरळीत करणे गरजेचे आहे.









