राधानगरी / प्रतिनिधी :
राधानगरी तालुका वर्षा पर्यटनासाठी ओळखला जातो, त्यामुळे जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील पर्यटक वर्षा पर्यटनासाठी येत असतात. राधानगरी शहरापासून 7 की मी अंतरावर असलेल्या राऊतवाडी धबधबा पाहण्यासाठी व पावसाळी पर्यटनासाठी युवकवर्गाची गर्दी दररोज वाढत आहे. विशेषतः शनिवारी , रविवारी व सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर युवकवर्ग, आबालवृद्धसह अनेक कुटूंबे हा धबधबा व पावसाळी पर्यटनासाठी येत असतात. मात्र अति उत्साही तरुणांनामुळे इतर पर्यटकांना नाहक त्रास सोसावा लागतो, याची प्रचिती रविवारी दुपारी चारच्या दरम्यान राऊतवाडी धबधब्यावर आली. पर्यायाने अशा पर्यटकांना राधानगरी पोलिसांकडून चोप देण्यात आला.
गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या निर्बंधामुळे पर्यटन स्थळे बंद होती. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने पुन्हा पर्यटन स्थळे गजबजून गेली. पावसाळ्याच्या सुरवातीस यावर्षी राऊतवाडी धबधब्याने उचांक गाठला असून, काही अतिउत्साही तरुण हिडीस नृत्य करणे, मद्य प्राशन करून रस्त्यावर मद्याच्या बाटल्या फोडणे, वेगाने मोटारसायकल चालवणे, कड्यावरून डोकावणे, पाण्यात उडी मारणे यामुळे धबधब्यावर किरकोळ अपघातांचे प्रमाण वाढले आहे. वारंवार होणारी वाहतूक कोंडी एकतर्फी केलेले वाहनाचे पार्किंग यामुळे येथील स्थानिक नागरिकांना त्रास सोसावा लागतो, याची जाणीव ठेवून पर्यटकांनी धबधब्याचा आनंद लुटावा. स्थानिकांना त्रास होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनास सहकार्य करावे. अन्यथा पर्यटकांवर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
हेही वाचा : राज्यात पावसाचा पुन्हा जोर वाढणार









