वृत्तसंस्था/ जॉर्जटाऊन (गयाना)
बांगलादेशचा कर्णधार आणि सलामीचा फलंदाज तमीम इक्बालने क्रिकेटच्या टी-20 प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली. बांगलादेश क्रिकेट संघाने विंडीजच्या दौऱयात वनडे मालिका एकतर्फी जिंकली. या मालिकेनंतर तमीम इक्बालने टी-20 या क्रीडाप्रकारातून निवृत्त होणार असल्याची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.
विंडीज विरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत तमीम इक्बालची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली. टी-20 या क्रिकेटच्या प्रकारातून आपण 6 महिन्यांच्या कालावधीसाठी ब्रेक घेणार असल्याचे संकेत तमीम इक्बालने गेल्या जानेवारीत दिले होते. तमीमने आपला शेवटचा टी-20 सामना मार्च 2020 साली खेळला होता. बांगलादेशच्या टी-20 संघामध्ये 2007 ते 2018 या कालावधीत तमीम इक्बालचा समावेश होता. या क्रीडाप्रकारात शतक नोंदविणारा तमीम इक्बाल हा बांगलादेशचा एकमेव फलंदाज आहे. बांगलादेशतर्फे तमीम इक्बालने 75 टी-20 सामन्यात 24.65 धावांच्या सरासरीने 1701 धावा जमविल्या आहेत.









