ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेसाठी महेंद्र आणि भाग्यश्रीची भारतीय संघात निवड
औंध / प्रतिनिधी :
आज लखनौ आणि सोनिपत येथे झालेल्या राष्ट्रीय निवड चाचणीत फ्री स्टाईल गटात महाराष्ट्रातील मल्ल महेंद्र गायकवाड (सांगोला) 125 किलो आणि भाग्यश्री फंड (श्रीगोंदा) 59 किलो यांची बल्गेरिया येथे होणाऱ्या ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
लखनौ येथे झालेल्या पुरुष राष्ट्रीय निवड चाचणीत महाराष्ट्रातील महेंद्र गायकवाड याने अतिशय नेत्रदीपक कामगिरी केली. उपांत्य फेरीत त्याने हरियाणाच्या अजितवर एकतर्फी विजय मिळवला. अंतिम फेरीत एशिया सुवर्णपदक विजेता अनिरुध्द (दिल्ली) याच्यावर दोन विरुद्ध एक गुणाने मात करून भारतीय संघातील आपले स्थान निश्चित केले. महेंद्र मूळचा शिरसी ता. सांगोला येथील असून, आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल पुणे येथे अर्जुनवीर काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्याने धडाकेबाज कामगिरी केली आहे.
सोनिपत येथे श्रीगोंदा तालुक्यातील नगरची कन्या भाग्यश्री फंडने उत्तर भारतीय महिला मल्लाना वरचढ ठरु न देता अंतिम फेरीतील निर्णायक लढत खिशात टाकून आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी आणि जागा निश्चित केली. भाग्यश्री नगरला इंटरनॅशनल कुस्ती संकुल येथे वडील हनुमंत फंड यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. तिने यापूर्वी देखील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दिमाखदार कामगिरी बजावली आहे. ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत महाराष्ट्रातील कुस्तीशौकिनांना मराठमोळ्या मल्लाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. ही स्पर्धा सोफीया (बल्गेरिया) येथे 15 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट अखेर होणार आहे. महेंद्र आणि भाग्यश्रीच्या दैदिप्यमान कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.