ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भारत आणि चीन यांच्यातील दिर्घकाळ सीमावाद सोडवण्यासाठी लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू आहेत. दोन्ही देशांमधील कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेची आज 16 वी फेरी पूर्व लडाख येथील चुशूल-मोल्डो मीटिंग पॉइंटवर भारतीय सीमेमध्ये होईल. LAC वरील तणाव कमी करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.
भारतीय सैन्याचे लेह स्थित 14 व्या कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल अनिंद्य सेनगुप्ता या बैठकीत सामील होतील. तर चीनच्या बाजूने दक्षिण तिबेट मिलिटरी डिस्ट्रिक्टचे प्रमुख मेजर जनरल यांग या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. भारताकडून या बैठकीत पूर्व लडाखला लागून असणाऱ्या LAC च्या पेट्रोलिंग पॉईंट क्रमांक 15 वरील तणाव कमी करणे. तसेच डेपसांग मैदान आणि डेमचोक यांसारख्या वादग्रस्त भागांबद्दल तोडगा काढण्यावर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येते.
गेल्या महिन्यात चीनी सैन्याने अक्साई भागात मोठा हवाई सराव केला आहे. यावेळी चीनची विमानं भारतीय क्षेत्राच्या अगदी जवळ पोहोचली होती. चीनच्या या हवाई सरावावर भारतीय हवाई दलाने निषेध नोंदवला होता. चिनी हवाई दलाच्या या हालचालींमुळे भारतीय हवाई दलाने पूर्व लडाखला लागून असलेल्या LAC च्या हवाई क्षेत्रात हवाई गस्त वाढवली आहे.
दरम्यान, या वर्षी 11 मार्च रोजी चीन-भारत कॉर्प्स कमांडर स्तरीय बैठकीची 15 वी फेरी झाली होती. या बैठकीदरम्यान दोन्ही बाजूंनी पश्चिम क्षेत्रातील LAC सह संबंधित समस्यांच्या निराकरणासाठी या वर्षी 12 जानेवारी रोजी झालेल्या मागील फेरीपासून चर्चा पुढे गेली. उर्वरित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी दोन्ही बाजुंच्या वतीने सविस्तर विचार विनिमय झाला. यावेळी त्यांनी पश्चिम क्षेत्रातील एलएसीसह शांतता पुनर्संचयित होईल आणि द्विपक्षीय संबंधांमध्ये प्रगती सुलभ होईल, असं स्पष्ट केलं होतं.
हेही वाचा : ठाकरे-शिंदे एकत्र येणार?; दिपाली सय्यद यांच्या ट्विटने चर्चांना उधाण









