ऑनलाईन टीम / तरुण भारत :
एकनाथ शिंदे यांनी 50 आमदारांसह बंडखोरी करत ठाकरे सरकार पाडले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी सेनेच्या बंडखोर आमदारांना परत बोलावण्याचे अनेक प्रयत्न केले. पण ते राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन करणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम होते. अखेर बंडखोर शिंदे गटाने भाजपसोबत सत्ता स्थापन केली अन् एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. दरम्यान, आता उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकमेकांना भेटणार असल्यासंदर्भात शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी ट्विट केलं आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
दिपाली सय्यद यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार आहेत. हे समजल्यावर खूप बरं वाटलं. शिंदे साहेबांना शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखांची भूमिका मोठय़ा मनाने निभावली हे स्पष्ट झाले. या मध्यस्तीकरता भाजप नेत्यांनी मदत केली, याबाबत धन्यवाद. चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल.”
या ट्विटपूर्वी सय्यद यांनी आणखी एक ट्विट केलं होतं. त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, “लवकरच आदित्य ठाकरे मंत्रीमंडळात दिसावेत, शिवसेनेच्या 50 आमदारांनी मातोश्रीवर दिसावे, आदरणीय उद्धव साहेब व आदरणीय शिंदेसाहेब एक व्हावे, शिवसेना हा गट नसून हिंदुत्वाचा गड आहे. त्यावरचा भगवा नेहमी डौलाने फडकत राहील.”
हेही वाचा : अरबी समुद्रात न्यून दाबाचे क्षेत्र








