ग्रामपंचायत निवडणूक 10 ऑगस्ट रोजी, उद्यापासून अर्ज भरणे
प्रतिनिधी/ पणजी
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ओबीसी आरक्षण अधिसूचना बुधवारी जारी झाल्यामुळे आरक्षणाच्या मुद्यावरून रखडलेली निवडणूकप्रक्रिया अखेर मार्गी लागली आहे. त्यानुसार येत्या 10 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार असून शनिवारी सायंकाळपासून सर्व संबंधित ग्रामपंचायतींच्या परिसरात आचारसंहिता लागू झाली आहे.
शनिवारी पणजीत पत्रकार परिषदेतून राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त डब्ल्यू व्ही राममूर्ती यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी निवडणूक कार्यक्रमाचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार उद्या सोमवार दि. 18 जुलैपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ होणार आहे. दि. 26 रोजी अर्जांची छाननी होणार असून 27 रोजी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर 10 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत मतपत्रिकेच्या माध्यमातून मतदान व दि. 12 रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणी प्रारंभ होईल. निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील, असे राममूर्ती यांनी सांगितले. निवडणूक लढविणाऱया उमेदवारास जास्तीत जास्त 40 हजार रुपये पर्यंत खर्च करता येईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात एकूण 191 पैकी 5 ग्रामपंचायतींची मुदत अद्याप संपलेली नसल्यामुळे उर्वरित 186 पंचायतींसाठी ही निवडणूक होणार आहे. अधिसूचनेनुसार ओबीसींना 20.10 टक्के आरक्षण जाहीर केले असून अनुसूचित जातींसाठी 21 जागा आणि अनसूचित जमातींसाठी 187 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच महिलांसाठीही राखीव प्रभाग जाहीर करण्यात आले आहेत. ओबीसीतील 19 घटकांना या आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्यात भंडारी, खारवी, कुंभार, तेली, शिंपी, कलयकार, लोहार, सतरकार, ख्रिस्ती महार, न्हावी, धोबी, नाथजोगी, गोसावी, धनगर, विश्वकर्मा, पागी, ठक्कर, कोमरपंत, रेंदेर यांचा समावेश आहे.
विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीनुसारच ही मतदान प्रक्रिया होणार आहे. त्यानुसार राज्यात 401725 पुरुष आणि 425372 महिला मिळून एकुण 8,27,099 मतदार आहेत. त्याशिवाय 2 तृतीयपंथीयांचीही गोव्यात मतदार म्हणून नोंद झालेली आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱयांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय 21 निर्वाचन अधिकारी आणि 21 साहाय्यक निर्वाचन अधिकारी तसेच 12 सर्वसाधारण निरीक्षक, 21 खर्च निरीक्षक यांच्यासह एकूण 10700 कर्मचारी प्रक्रियेवर लक्ष ठेवतील. त्यासाठी एकुण 15066 मतदान केंद्रे स्थापन करण्यात येणार आहेत, असे राममूर्ती यांनी सांगितले.
विधानसभा अधिवेशनावर परिणाम नाही
दरम्यान, शनिवारपासून राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून तिची व्याप्ती केवळ संबंधित पंचायत परिसरापूरतीच मर्यादित असेल. त्यामुळे सध्या चालू असलेल्या विधानसभा अधिवेशनावर त्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे राममूर्ती यांनी स्पष्ट केले. केवळ ग्रामपंचायतीसंबंधी कोणतीही घोषणा किंवा आश्वासन देण्यात येणार नाही याकडे आम्ही लक्ष ठेवणार असल्याचे ते म्हणाले.
पत्रकार परिषदेस साहाय्यक संचालक सागर गुरव, सचिव ब्रिजेश मणेरकर, विशेष सेवा अधिकारी दुर्गाप्रसाद आणि आशुतोष आपटे यांची उपस्थिती होती.









