सिंगापूर ओपन बॅडमिंटन ः आज अंतिम लढतीत वँगविरुद्ध मुकाबला
सिंगापूर / वृत्तसंस्था
भारतीय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत अंतिम फेरीत जोरदार धडक मारली. तिने शनिवारी रंगलेल्या उपांत्य सामन्यात जपानच्या साएना कावाकामीविरुद्ध 21-15, 21-7 अशा फरकाने विजय मिळवला. ही उपांत्य लढत अवघ्या 32 मिनिटात निकाली झाली. आता या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सिंधूची लढत चीनच्या 22 वर्षीय वँग झी यि हिच्याविरुद्ध होईल.
यापूर्वी आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्य जिंकणाऱया 27 वर्षीय सिंधूला 2022 हंगामातील पहिल्या जेतेपदाची प्रतीक्षा असून आशियाई चॅम्पियनशिप सुवर्णजेती वँग झी तिच्याविरुद्ध जोरदार आव्हान उभे करण्यासाठी महत्त्वाकांक्षी असेल. वँगने जपानच्या ओहोरीचा 21-14, 21-14 असा पराभव करत अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले.
सिंधू व वँग यांच्यात यंदा ऑल इंग्लंड चॅम्पियनशिपमध्ये लढत झाली असून त्यात सिंधूने बाजी मारली होती. दोनवेळची वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियन व युवा ऑलिम्पिक रौप्यजेती वँग ही यापूर्वी जूनमध्ये इंडोनेशिया ओपन सुपर 1000 स्पर्धेत फायनलपर्यंत पोहोचली होती. आज उभयतातील फायनल भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी 10.30 नंतर खेळवली जाणार असून त्याचे थेट प्रक्षेपण स्पोर्ट्स 18-1 व बीडब्ल्यूएफ यूटय़ूब चॅनेलवर केले जाईल.









