वृत्तसंस्था/ ऑकलंड
न्यूझीलंडचा क्रिकेट संघ सध्या युरोपियन दौऱयावर आहे. न्यूझीलंड संघातील वेगवान गोलंदाज ऍडम मिल्ने याला पायाच्या स्नायूची दुखापत झाल्याने तो या दौऱयातील उर्वरित कालावधीसाठी उपलब्ध होऊ शकणार नाही, अशी माहिती क्रिकेट न्यूझीलंडच्या प्रवक्त्याने दिली.
आयर्लंडमध्ये न्यूझीलंड संघाचा नेटमध्ये सराव सुरु असताना मिल्नेला या दुखापतीच्या वेदना जाणवू लागल्या. लागलीच त्याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या दुखापतीचे स्कॅनिंग केले असताना त्याला काही दिवस विश्रांतीची जरुरी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. न्यूझीलंड संघाचे युरोपियन दौऱयातील आता शेवटचे दोन सामने हॉलंडबरोबर होणार आहेत. या सामन्यात मिल्ने उपलब्ध राहणार नसल्याने संघाला अतिरिक्त वेगवान गोलंदाजाची जरुरी भासत आहे. जेकॉब डफीला बदली खेळाडू म्हणून पाठविले जाईल, असे सांगण्यात आले. न्यूझीलंड संघाचा आयर्लंडबरोबर आणखी एक वनडे सामना शुक्रवारी होत आहे. हा सामना संपल्यानंतर न्यूझीलंडचा टी-20 संघ शनिवारी बेलफास्टला प्रयाण करेल. येत्या सोमवारी न्यूझीलंड आणि हॉलंड यांच्यात पहिला टी-20 सामना खेळविला जाईल. न्यूझीलंडच्या टी-20 संघातील सदस्य चॅपमन, डॅरियल मिचेल, रिपॉन आणि बेन सिरेस हे गुरुवारी डब्लिनमध्ये दाखल झाले आहेत.









