पुरुष दुहेरीत अर्जुन-धुव कपिला यांचे आव्हानही समाप्त
वृत्तसंस्था/ सिंगापूर
भारताच्या पीव्ही सिंधूने रोमांचक विजय मिळवित सिंगापूर ओपन सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले. मात्र सायना नेहवाल व एचएस प्रणॉय तसेच पुरुष दुहेरीत एमआर अर्जुन व ध्रुव कपिला यांचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले.
तिसरे मानांकन मिळालेल्या सिंधूने चीनच्या हान युईचे कडवे आव्हान 17-21, 21-11, 21-19 असे परतावून लावत रोमांचक विजय मिळविला. एक तासाहून अधिक वेळ ही लढत रंगली होती. गेल्या मेमध्ये थायलंड ओपनमध्ये उपांत्य फेरी गाठल्यानंतर सिंधूची ही उपांत्य फेरी गाठण्याची पहिलीच वेळ आहे. तिची उपांत्य लढत जपानच्या बिगरमानांकित साएना कावाकामीविरुद्ध होईल. कावाकामी जागतिक क्रमवारीत 38 व्या स्थानावर आहे. तिने थायलंडच्या सहाव्या मानांकित पोर्नपावी चोचुवाँगला 21-17, 21-19 असा पराभवाचा धक्का देत आगेकूच केली आहे. या स्पर्धेत सिंधू ही एकमेव भारतीय स्पर्धक बाकी राहिली असून राष्ट्रकुल स्पर्धेआधीच्या या शेवटच्या स्पर्धेत सिंधू जेतेपद मिळविण्यात यशस्वी होते का हे पहावे लागेल. कावाकामीविरुद्ध तिची कामगिरी 2-0 अशी असल्याने उपांत्य फेरीत सिंधूचेच पारडे जड असेल. चीनच्या हान युईविरुद्ध मात्र सिंधूने आजवरच्या तीनही लढती जिंकल्या आहेत.
लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य मिळविलेल्य सायना नेहवालने चीनच्या नवव्या मानांकित हे बिंग जिआवर उपांत्यपूर्व फेरीत विजय मिळविताना पूर्वीचा दर्जा दाखवून दिला होता. जपानच्या आया ओहोरीविरुद्धही तिने ही चुणूक दाखविली. पण आघाडी मिळवूनही तिला ती राखता आली नाही आणि ओहोरीकडून तिला 13-21, 21-15, 20-21 असा पराभव स्वाकारावा लागला. 32 वर्षीय सायनाला दोनदा मॅचपॉईंट्सचा लाभ उठविता न आल्याने तिला पराभवाला सामोरे जावे लागले.
पुरुष एकेरीत फॉर्ममध्ये असलेल्या एचएस प्रणॉयनेही शानदार प्रदर्शन केले. पहिला गेम 9 गुणांच्या फरकाने जिंकून त्याने कोदाई नाराओकावर आघाडी घेतली होती. पण नंतरच्या दोन गेममध्ये चांगला खेळ करूनही प्रणॉयला 12-21, 21-14, 21-18 अशी हार पत्करावी लागली. यातील निर्णायक गेमवेळी प्रणॉयने जबरदस्त झुंज दिली. 7-18 असे पिछाडीवर असताना त्याने जोरदार मुसंडी मारत सलग आठ गुण मिळविले. 15-20 वर असताना प्रणॉयने मॅचपॉईंट्स वाचवत सामना लांबवला. पण अखेर त्याला 63 मिनिटे रंगलेली ही लढत गमवावी लागली.
सिंधूलाही पहिल्या गेममध्ये हान युईने कडवा प्रतिकार झाला. पण नंतरच्या दोन गेममध्ये सिंधूने मुसंडी मारत 62 मिनिटांत विजय साकारला. पुरुष दुहेरीत एमआर अर्जुन व ध्रुव कपिला यांनीही इंडोनेशियाच्या दुसऱया मानांकित मोहम्मद एहसान व हेंद्रा सेतियावान यांना विजयासाठी तीन गेमपर्यंत संघर्ष करण्यास भाग पाडले. अर्जुन-कपिला यांना त्यांच्याकडून 10-21, 21-18, 21-17 असा पराभव स्वीकारावा लागला.









