अन्यथा ठोठावला जाणार दंड
फिलिपाईन्समधील सरकारी कर्मचाऱयांना आदेश
जीवनात हास्य असणे आवश्यक आहे. परंतु हे हास्य चेहऱयावर असण्याची सक्ती करणारा कायदा आतापर्यंत नव्हता. परंतु अलिकडेच एक आदेश काढण्यात आला असून यानुसार सरकारी कर्मचाऱयांना कार्यालयामध्ये हसरा चेहरा ठेवण्यास सांगण्यात आले आहे. तसेच चेहरा हसरा नसल्यास दंड ठोठावण्यात येणार असल्याचे म्हटले गेले आहे.
हा आदेश फिलिपाईन्सच्या एका महापौराने स्थानिक स्तरावर दिला आहे. सरकारी कर्मचाऱयांना कार्यालयात हसतमुखासह काम करावे लागेल. असे न केल्यास दंड ठोठावला जाऊ शकतो असे आदेशात नमूद आहे.

6 महिन्यांची वेतनकपात
जो हा आदेश पाळणार नाहीत, त्यांचे 6 महिन्यांचे वेतन कापले जाणार आहे. तसेच कर्मचाऱयांना निलंबितही केले जाऊ शकते असे कर्मचाऱयांना स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. महापौर एरिस्टोटल अगूरी यांच्या या धोरणाचे नाव स्माइल पॉलिसी असून यांतर्गत सरकारी कर्मचाऱयांना हसतमुख राहण्याचा आदेश देण्यात आला आहे. महापौर स्थानिक प्रशासनाच्या स्तरावर सेवांमध्ये सुधारणा घडवून आणू पाहत आहेत. जेव्हा लोक स्वतःच्या कामासाठी कार्यालयांमध्ये येतील, तेव्हा त्यांना आनंदी वातावरण मिळावे अशी महापौरांची इच्छा आहे.
भूमिकेत बदलाची इच्छा
महापौर एरिस्टोटल अगूरी सरकारी कर्मचाऱयांच्या भूमिकेत बदल इच्छित आहेत. स्थानिक स्तरावर मिळत असलेल्या तक्रारी पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे. एरिस्टोटल अगूरी यांनी चालू महिन्यात ल्युझॉन बेटाच्या क्यूजॉन प्रांतातील मूलाने शहरात पदभार स्वीकारला आहे. काही दिवसांतच त्यांनी स्माइल पॉलिसी सादर केली आहे.









