ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामागे मोठं षढयंत्र सुरू आहे. उपमुख्यमंत्र्यांकडून मुख्यमंत्र्यांचा अपमान केला जात आहे. मुख्यमंत्र्यांना मुद्दाम प्रॉम्प्टिंग करणे, चिठ्ठी पाठवणे यासारख्या गोष्टी करुन त्यांना कमी दाखविण्याचा वारंवार प्रयत्न होतोय. महाराष्ट्रातील जनता हे कदापी सहन करणार नाही. बिचारे मुख्यमंत्री, मला त्यांची काळजी वाटते, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
पुणे महानगरपालिका समाज विकास विभाग महिला बचत गटातील महिलांसाठी विविध कोर्सचे शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी सहभागी महिलांना सुळे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. सुळे म्हणाल्या, नवीन सरकार गोंधळलेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांना कमी दाखविण्याचा प्रयत्न होत आहे. वृत्तवाहिन्यांनी चार अशा गोष्टी दाखवल्या आहेत, ज्यात मुख्यमंत्र्यांचा अपमान होताना किंवा प्रॉम्प्टिंग करताना दिसत आहे. हे महाराष्ट्राला शोभणारं नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान आहे.
अजित पवारांनी फंड दिला नाही, म्हणून आम्ही वेगळा गट करतोय, असे सेनेच्या अनेक बंडखोर आमदारांनी सांगितलं. एक स्वाभिमानी महिला म्हणून मला त्या आमदारांना प्रश्न विचारायचा आहे की, तुम्ही निधी मिळत नाही तसेच शिवसेनेने हिंदुत्त्व सोडलं असं सांगत वेगळा गट केला. मग आता तुमचा स्वाभिमान कुठे गेला? राज्याचा मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा नसतो. भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडून माझ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सातत्याने अपमान करत असेल तर माझा स्वाभिमान जागा आहे आणि जागा राहिल. दिल्लीपुढे हा महाराष्ट्र कधीही झुकलेला नाही आणि झुकू देणार नाही, असेही सुळे म्हणाल्या.
हेही वाचा : सेनेला पुन्हा धक्का; नवी मुंबईतील आणखी 5 नगरसेवक शिंदे गटात