महापालिकेच्या 12 गाळय़ांसाठी बोली : प्रतिमाह मिळणार 1 लाख 37 हजार भाडे
प्रतिनिधी /बेळगाव
मध्यवर्ती बसस्थानकासमोरील महापालिकेच्या व्यापारी संकुलातील 23 गाळय़ांचा लिलाव बुधवारी झाला. यापैकी 12 गाळय़ांना भाडेकरू मिळाले असून तब्बल 25 हजार रुपये सर्वाधिक बोली लागली. 12 दुकानांच्या माध्यमातून महापालिकेला प्रतिमाह 1 लाख 37 हजार 600 रुपये भाडे मिळणार आहे. तसेच 6 लाख 82 हजार रुपये अनामत रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे लिलावास चांगला प्रतिसाद मिळाला.
महापालिकेच्या व्यापारी संकुलातील विविध गाळय़ांची लिलाव प्रक्रिया दोन दिवसांपासून सुरू आहे. सोमवार व मंगळवारी झालेल्या लिलावात नागरिकांनी सहभाग घेतला नसल्याने थंडा प्रतिसाद लाभला. मात्र बुधवारी 23 पैकी 12 गाळय़ांना बोली लागली. मध्यवर्ती बसस्थानकासमोर तीन विविध व्यापारी संकुले असून या संकुलातील गाळय़ांचा लिलाव आयोजित केला होता. 163 गाळय़ांपैकी केवळ 20 गाळय़ांना बोली लावण्यात आली. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकासमोरील व्यापारी संकुलातील गाळय़ांना भाडेकरू मिळणार का? असा मुद्दा उपस्थित झाला होता. पण येथील गाळय़ांना भाडेकरू मिळाले आहेत.
वर्षाकाठी 16 लाख 51 हजार महसूल मिळणार
3 हजार 200 रुपये एका गाळय़ासाठी महापालिकेने भाडय़ाची रक्कम निश्चित केली होती. लिलाव प्रक्रियेवेळी तब्बल 25 हजार रुपयांपर्यंत बोली लागली. लिलाव प्रक्रियेत 36 नागरिकांनी सहभाग घेतला होता. 12 गाळय़ांच्या माध्यमातून महापालिकेला महिन्याला 1 लाख 37 हजार 600 प्रमाणे वर्षाकाठी 16 लाख 51 हजार रुपये महसूल मिळणार आहे. लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली असून याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. तसेच उर्वरित गाळय़ांसाठी नव्याने लिलाव प्रक्रिया राबविण्याची शक्मयता आहे.
यावेळी महसूल उपायुक्त प्रशांत हनगंडी, महसूल अधिकारी संतोष अनिशेट्टर, फारुक यड्रावी, बाबू माळन्नावर, महसूल निरीक्षक मल्लिक गुंडप्पण्णावर, कायदा अधिकारी यु. डी. महांतशेट्टी व इतर अधिकारी उपस्थित होते.