डॉ. सचिन सुगण्णावर यांची माहिती : मिरज येथे आयोजन : आधुनिक तंत्रज्ञानावर होणार तपासणी
प्रतिनिधी /मिरज
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून शहरातील सचिन हॉस्पिटलच्यावतीने गेली अनेक वर्षे राबविण्यात येत असलेल्या सामाजिक उपक्रमांपैकी एक म्हणजे मोफत तपासणी शिबिर होय. हे शिबिर रविवार 17 जुलै रोजी सकाळी 9 ते 4 वाजेपर्यंत होणार आहे. या शिबिरामध्ये वंध्यत्वाची कारणे, उपचार व स्त्रीरोग यावर आधुनिक तंत्रज्ञानावर तपासणी आणि मोफत सल्ला दिला जाणार असल्याची माहिती डॉ. सचिन सुगण्णावर यांनी दिली.
सचिन हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे मुल न झालेल्या दाम्पत्यांना व स्त्रियांमधील विविध आजारांवर हॉस्पिटलच्यावतीने उपचार करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देत आहोत, असेही डॉ. सुगण्णावर म्हणाले. हॉस्पिटलच्यावतीने आतापर्यंत राबविण्यात आलेल्या शेकडो मोफत शिबिरांमुळे हजारो रुग्णांना लाभ झाला आहे. अपत्यहिन दाम्पत्यांच्या जीवनामध्ये नवसंजीवनी निर्माण करण्याचे व महिलांमधील आजारांवर यशस्वी उपचार करण्याचे कार्य हॉस्पिटलकडून घडत आहे.
या शिबिराच्या माध्यमातून मुल न झालेल्या दाम्पत्यांच्या दोषाविषयी मार्गदर्शन व टेस्ट टय़ूब बेबीसारख्या प्रगत तंत्रज्ञानाविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात येते. विशेषतः गर्भाशयात प्रक्रिया केलेल्या शुक्राणूंचे रोपण, वीर्यपेढी स्त्रीबीज दान, गर्भ गोठवून ठेवणे, आयव्हीएफ, आयसीएसआय, आयएमएसआय व व्हेरिफिकेशन याचबरोबर बंद गर्भनलिका चालू करणे, स्त्रीबीज तयार न होणे यावर मार्गदर्शन करण्यात येते. पुरुष वंद्यत्वामुळे शुक्राणूंमधील दोष संख्या कमी असणे, ताकद कमी असणे, शुक्राणू मृत असणे, लैंगिक समस्या यावर आधुनिक उपचाराची व मायक्रोसर्जरीची माहिती या शिबिरातून दिली जाते.
टेस्ट टय़ूब बेबी व आययूआय तंत्रज्ञानामध्ये अनेक प्रकार असतात. स्त्री व पुरुषांमधील दोषानुरुप उपचारपद्धती निवडावी लागते. त्याअनुषंगाने खर्च येत असतो. स्त्री आरोग्यामध्ये पाळीच्या गर्भाशयाच्या गाठी, अंडाशयाला सुज, पांढरे जाणे आदी गर्भाशय आजारांवर दुर्बिनीद्वारे व तंत्रज्ञानाने आधुनिक उपचार करता येतात. त्याचबरोबर कॅन्सरसारख्या आजारावर आधुनिक मशीनचा वापर करून लवकर निदान व उपचार करणाऱया तंत्राविषयी माहिती दिली जाते. गर्भाशयाच्या गंभीर स्वरुपाच्या आजारावर गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेची गरज असल्यास आधुनिक पद्धतीने व कमी खर्चामध्ये शस्त्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध आहे. महाराष्ट्र व कर्नाटक सीमाभागातील अनेक रुग्णांना हॉस्पिटलमधील औषधोपचार व टेस्ट टय़ूब बेबी या तंत्रज्ञानाने अपत्य प्राप्तीचे भाग्य लाभले आहे, असेही डॉ. सचिन सुगण्णावर म्हणाले. रविवारी होणाऱया या मोफत शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. सचिन सुगण्णावर यांनी केले आहे.









