पेरणी अंतिम टप्प्यात : खाद्यतेलांच्या किमती वाढल्याने सूर्यफूल, सोयाबीन पेरणी क्षेत्रात वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
कृषी खात्याने यंदाच्या खरीप हंगामात 7.53 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी 6 लाख 20 हजार 803 हेक्टर क्षेत्रात पेरणी पूर्ण झाली आहे. उर्वरित पेरणीचे कामदेखील सुरू आहे. यंदा पाऊस लांबणीवर पडल्याने पेरणीच्या कामांना उशिराने प्रारंभ झाला असला तरी सरासरी पेरणीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.
जिल्हय़ात खरीप हंगामासाठी भात, सोयाबीन, भुईमूग, कापूस, सूर्यफूल, ऊस, मका, मूग आदी पिकांची पेरणी आणि लागवड झाली आहे. गत वषीच्या तुलनेत यंदा 3600 हेक्टर क्षेत्र वाढले आहे. विशेषतः खाद्यतेलांच्या किमती वाढल्याने सूर्यफूल, सोयाबीन पेरणीचे क्षेत्र वाढले आहे. परिणामी तेलबियाणांची मागणी देखील वाढली होती. जून महिन्यात म्हणावा तसा पाऊस झाला नसल्याने पेरणीला जोर आला नव्हता. मात्र जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ापासून दमदार पावसाला सुरुवात झाल्याने बहुतांशी भागात पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आली आहेत.
यंदा पेरणी उद्दिष्टात वाढ
गतवषी 7.16 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी 6.68 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती. दरम्यान अतिपाऊस आणि पुराचा फटका देखील पिकांना बसला होता. गत वषीच्या तुलनेत यंदा पेरणीच्या उद्दिष्टात वाढ झाली आहे. खात्याने बी-बियाणे खाते आणि कीटकनाशकांची रयत संपर्क केंद्र आणि कृषी पत्तीन संघांमध्ये व्यवस्था केली आहे. मात्र जून महिन्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या होत्या. मात्र आता पावसाबरोबर पेरणीची कामे जोमाने सुरू झाली आहेत. यंदा भात लागवडीबरोबर सोयाबीन, सूर्यफूल, मका, मूग पेरणीचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे सोयाबीन सूर्यफुलाच्या उत्पादनात वाढ होईल, अशी अपेक्षा खात्याने ठेवली आहे.
90 टक्के पेरणीचे उद्दिष्ट पूर्ण
आतापर्यंत 90 टक्के पेरणीचे उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. उर्वरित पेरणीदेखील सुरू आहे. शेतकऱयांना बियाणे आणि खतांचा योग्य पुरवठा केला होता. जून अखेरीस आणि जुलैच्या पहिल्या आठवडय़ात पेरणी कामे बऱयापैकी पूर्ण झाली आहेत.
– एच. डी. कोळेकर (उपनिर्देशक कृषी खाते)