मिरजेतील घटना घटना, सलून चालकावर ब्लेडने वार
प्रतिनिधी / मिरज
सलून दुकानदाराने मिशी कापली नाही, म्हणून ग्राहकाने सलून दुकानावर दगडफेक करुन दुकान फोडण्यासह सलून चालकावर ब्लेडने वार करुन जखमी केल्याची घटना शहरातील शंभर फुटी रोड, ख्वॉजा वसाहत येथे घडली. याप्रकरणी सलून चालक अर्जून गोविंद जाधव (वय 49, रा. गुरूवार पेठ, मिरज) यांनी महात्मा गांधी चौकी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोहेल उर्फ चुआ निजाम सोलकर (वय 30, रा. ख्वॉजा वस्ती, मिरज) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, अर्जून जाधव यांचे शहरात शंभर फुटी रोड, ख्वॉजा वस्ती येथे चॉईस सलून दुकान आहे. याच परिसरात राहणारा सोहेल सोलकर हा सोमवारी सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास मिशी कापण्यासाठी आला होता. त्याने जाधव यांनी आपली मिशी कापण्यास सांगितले. मात्र, जाधव यांनी सकाळी दुकान उघडले असून, गिऱ्हाईक आहेत. भवानी होईपर्यंत थोडावेळ थांब असे सांगितल्यानंतर सोहेल सोलकर याला राग आला.
त्याने दुकानाच्या बाहेर जावून दगडफेक केली. यामध्ये सलून दुकानातील काचा फुटून सुमारे एक हजार रुपयांचे नुकसान झाले. काचा फोडल्याबाबत जाधव यांनी सोहेल याला जाब विचारला असता, त्याने माझी मिशी का कापली नाहीस, असे म्हणून जाधव यांचा कॉलर पकडून शिवीगाळ करत कानाखाली मारली. त्यानंतर ब्लेड घेऊन जाधव यांच्या डाव्या हातावर वार केला. तसेच हातावर चावा घेऊन सलून चालक जाधव यांना जखमी केले.