ऑनलाईन टीम/तरुण भारत
एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर शिवसेनेत (Shivsena) दोन गट पडले आहेत. शिंदेंसोबत ४० आमदार गेलेत. या आमदारांनी मविआमधून बाहेर पडून भाजप बरोबर युती करण्याची मागणी केली होती. आता सेनेच्या खासदारांनीही राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना पाठिंबा देण्यासाठी आग्रह केला आहे. यांनतर शिवसेनेनं सावध पवित्रा घेत खासदारही सेना सोडून शिंदें गटात सामील होऊ नये यासाठी नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसत आहे. काल सेनाभवनावर झालेल्या खासदारांच्या बैठकीत द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली होती. यावर संजय राऊत यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याबाबत संकेत दिले आहेत.
दरम्यान, पक्षात झालेल्या मोठ्या बंडखोरीनंतर शिवसेना नरमण्याची चिन्हे आहेत. एनडीएच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देऊ शकते. याबाबतची औपचारिक घोषणा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत. असे संकेत देत पक्षाचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनीही या निर्णयाचे कारण दिले आहे.
राऊत म्हणाले की, सोमवारी आम्ही शिवसेनेच्या बैठकीत द्रौपदी मुर्मूला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर चर्चा केली. मुर्मूला पाठिंबा दिल्याचा अर्थ आम्ही भाजपला पाठिंबा देत आहोत असा होत नाही. आदिवासी नेत्याच्या नावाने आपण द्रौपदी मुर्मूचे समर्थन करू शकतो. आम्ही यापूर्वीही असे निर्णय घेत आलो आहोत. शिवसेना कोणाला पाठिंबा देणार, हे एक-दोन दिवसांत स्पष्ट होईल. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निर्णय घेतील.
प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी एनडीएचे नसतानाही पाठिंबा
राऊत पुढे म्हणाले की, विरोध टिकला पाहिजे. विरोधी पक्षाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्याबद्दलही आमची सदिच्छा आहे. यापूर्वी आम्ही राष्ट्रपतीपदासाठी प्रतिभा पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्या एनडीएच्या उमेदवार नव्हत्या. प्रबन मुखर्जी यांनाही आम्ही पाठिंबा दिला. शिवसेना कोणत्याही दबावाखाली निर्णय घेत नाही, असे राऊत म्हणाले.
पक्षाचे खासदार मुर्मू यांच्या बाजूने
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या मुद्द्यावर झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या अनेक खासदारांनी मुर्मू यांच्या समर्थनार्थ मत व्यक्त केले. या बैठकीत संजय राऊत एकाकी पडल्याचे सांगण्यात येत असून त्यांनी शिवसेनेचे संयुक्त विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. पक्षाच्या बहुतांश खासदारांच्या मताशी सहमती दर्शवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करू शकतात, असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी १८ जुलै रोजी मतदान होणार आहे.