दिल्ली येथे लेबर कमिटीची बैठक सदैव शिवसेनेसोबतच- खासदार मंडलिक
कोल्हापूर प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेनेच्या खासदारांमध्येही अस्वस्थता निर्माण झाल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी खासदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीस कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक अनुपस्थित असल्यामुळे समाजमाध्यमांमध्ये वेगळीच चर्चा सुरु झाली. पण याबाबत खासदार मंडलिक यांच्याशी संपर्क साधला असता लेबर कमिटीची बैठक असल्यामुळे दोन दिवसांसाठी दिल्ली येथे गेलो आहे. याबाबत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगितले असून त्यांची परवानगी घेतली असल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले.
अधिक वाचा- नृसिंहवाडीत पहाटे तीन वाजता दक्षिणद्वार सोहळा संपन्न
खासदारांच्या आगामी राष्ट्रपती निवडणुकीमध्ये कोणाला पाठिंबा द्यायचा ? याबाबत चर्चा करण्यासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत शिवसेना खासदारांची बैठक आयोजित केली होती. काही शिवसेना खासदारांनी भाजपने राष्ट्रपती पदासाठी निश्चित केलेल्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी केली आहे. खासदार राहुल शेवाळे यांनी तर पत्र लिहून त्याबाबत विनंती केली असल्याची चर्चा आहे. सोमवारच्या बैठकीत शिवसेनेच्या 18 पैकी 12 खासदारांनी उपस्थित होते. तर सहा खासदार अनुपस्थित राहिल्याने पुन्हा एकदा चर्चेला पेव फुटला. अनुपस्थित खासदारांमध्ये कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांचाही समावेश असल्यामुळे जिह्याच्या राजकीय वर्तुळात पुन्हा तर्कवितर्क लढविण्यास सुरुवात झाली. पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परवानगीने दिल्लीतील लेबर कमिटीच्या बैठकीला उपस्थित राहिल्याने मुंबईतील बैठकीला उपस्थित राहू शकलो नसल्याचे त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना सांगितले.
सदैव शिवसेनेसोबत
काहीजण शिवसेना सोडून गेले आहेत, तर काही जाणार आहेत अशी चर्चा सुरु आहे. पण मी सदैव शिवसेनेसोबतच राहणार असल्याचे खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले









