प्रतिनिधी /बेळगाव
प्रसिद्ध गोडचिनमलकी (ता. गोकाक) धबधब्याजवळ सोमवारी पोलिसांनी जागृती मोहीम राबविली. धोकादायक ठिकाणी सेल्फीसाठी जाणाऱया पर्यटकांना आवरण्यासाठी धबधब्याजवळ फिती बांधण्यात आल्या आहेत.
विकेंडमुळे शनिवार व रविवारी गोकाक फॉल्स व गोडचिनमलकी परिसरात गर्दी झाली होती. तरुणाईची हुल्लडबाजी वाढली होती. ही गोष्ट लक्षात येताच जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी स्वतः गोकाक फॉल्सला भेट देऊन पाहणी केली होती आणि अधिकाऱयांना सूचना केल्या होत्या.
सोमवारी गोकाक पोलिसांनी गोडचिनमलकी धबधबा परिसरात जागृतीची मोहीम राबविली. संततधार पावसामुळे धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. वर्षा पर्यटनासाठी येणाऱया पर्यटकांकडून सेल्फीसाठी धोके पत्करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळेच पोलिसांनी जागृतीची मोहीम हाती घेतली आहे.
सुरक्षिततेसाठी पर्यटकांनी पाण्यात उतरू नये. लांबूनच धबधब्याचा आनंद लुटावा, निसरडय़ा दगडांवर उभे राहून सेल्फी घेण्याचे धाडस करू नये. धबधब्याचा आनंद घेताना सुरक्षिततेचीही काळजी घेण्याचे आवाहन पोलीस अधिकाऱयांनी केले आहे. पर्यटकांना बोलावून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.









