बंदी असूनही युवकांचा प्रवास सुरूच : दूधसागर परिसरात 50 हून अधिक रेल्वे पोलीस तैनात
प्रतिनिधी /बेळगाव
दूधसागर धबधब्यानजीक होणारी हुल्लडबाजी व त्यातून अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी रेल्वे अधिकाऱयांकडून दूधसागर धबधब्यावर जाण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. असे असतानाही काही पर्यटक दूधसागर येथे दाखल होत आहेत. शनिवारी व रविवारी अशा पर्यटकांना रेल्वे पोलिसांनी रोखून धरत त्यांना माघारी पाठविले.
बेळगाव ते वास्को या दरम्यानच्या रेल्वेमार्गावर जगप्रसिद्ध दूधसागर धबधबा आहे. बरेच प्रवासी बेळगाव, लोंढा, कॅसलरॉकमार्गे रेल्वेने दूधसागर येथील धबधब्यानजीक पोहोचतात. अवघी काही मिनिटे या स्थानकावर रेल्वे थांबते. त्यामुळे रेल्वेमध्ये चढणाऱया व उतरणाऱया प्रवाशांमध्ये झटापट होत आहे. मागील आठवडय़ात धोकादायक प्रवास करतानाचे काही व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित झाले होते. तसेच दूधसागर परिसरात फिरताना रेल्वेमार्गावरून मद्यसेवन करून फिरणारे तरुण निदर्शनास येत असल्याने या प्रकारांना आळा घालण्यासाठी रेल्वे अधिकाऱयांनी पर्यटकांसाठी बंदी घातली आहे.
बंदी घालूनही शनिवारी सकाळी बेळगाव, कोल्हापूर, हुबळी या परिसरातील हजाराहून अधिक पर्यटक दूधसागर परिसरात दाखल झाले होते. परंतु रेल्वे पोलिसांनी या पर्यटकांना रोखले. पर्यटकांनी विनंती करूनही रेल्वे पोलिसांनी पर्यटकांना माघारी जाण्याची सूचना केली. दूधसागर परिसरात 50 हून अधिक रेल्वे पोलीस तैनात होते. त्यामुळे पर्यटकांना धबधबा न पाहताच माघारी फिरावे लागले.
रेल्वेकडून प्रवाशांना सूचना
दूधसागर धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांना बंदी करण्यात आल्याची सूचना जवळच्या सर्व रेल्वेस्थानकांवर दिली जात आहे. लोंढा, कॅसलरॉक, कारंजळ या रेल्वेस्थानकांवर त्याबाबतची सूचनाही लाऊड स्पिकरच्या माध्यमातून दिली जात आहे. परंतु पर्यटक कानाडोळा करत दूधसागरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. धबधब्यावर बंदी असल्यामुळे कोणत्याही पर्यटकांनी दूधसागर परिसरात येऊ नये, अशी सूचना रेल्वे पोलिसांनी केली आहे.









