हुल्लडबाजीला ऊत, वनखात्याकडून प्रतिव्यक्ती 250 रु. करवसुली, पर्यटकांकडून नाराजी
प्रतिनिधी /खानापूर
तालुक्याच्या पश्चिम भागातील जांबोटी, कणकुंबी, माण, सडा, चोर्ला, चिखले, पारवाड, चिगुळे, भटवाडा व वज्रपोहा, कापोली, चापोली या ठिकाणी जंगलातील निसर्गसौंदर्य तसेच जलप्रपात पाहण्यासाठी हजारो पर्यटक गेल्या काही दिवसांपासून या भागात येत आहेत. पर्यटकांच्या गर्दीमुळे या भागातील दळणवळण यंत्रणा ठप्प झाली आहे. वनखात्याने यावर निर्बंध आणले असून वनखात्याकडून प्रतीव्यक्ती 250 रुपये अधिक जीएसटी आकारण्यात सुरुवात केली आहे. याबद्दल पर्यटकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. तर स्थानिकांना पर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत प्रशासकीय यंत्रणेने चोख बंदोबस्त करावा, अशी मागणी या भागातील ग्रामस्थांतून होत आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागातील निसर्गसौंदर्य तसेच जंगलातील नैसर्गिक धबधबे पाहण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून पर्यटक जांबोटी, कणकुंबी, चोर्ला या परिसरात येत आहेत. बेळगाव, विजापूर, गोकाक, चिकोडी, अथणी, हुक्केरी, हुबळी या भागातील पर्यटक तसेच कॉलेज विद्यार्थी, युवक, युवती मोठय़ा प्रमाणात वर्षा पर्यटनासाठी येत आहेत. शनिवार व रविवार या दिवशी तर पर्यटकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे. पर्यटक मुख्य रस्त्याच्या बाजूला आपली वाहने लावून जंगलात पर्यटनाला जात आहेत. तसेच रस्त्यावरच पर्यटक हुल्लडबाजी करताना दिसत आहेत. यामुळे आसपासच्या ग्रामस्थांना देखील याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत स्थानिकांनी पर्यटकांना समजही दिली आहे. मात्र या भागात म्हणावा तसा पोलीस बंदोबस्त तसेच वनखात्याचे शिपाई मोजकेच असल्याने पर्यटकांना आवरणे कठीण बनले आहे. पर्यटक निसर्गसौंदर्य लुटण्यासाठी येतात. मात्र याबरोबरच इतर प्रकारही घडत असल्यामुळे स्थानिकांत याबाबत नाराजी पसरली आहे.
वनखात्याकडून दरडोई 250 ची कर आकारणी
कणकुंबी, चोर्ला, माण, सडा हा पश्चिम भाग संरक्षित वनक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. वनखात्याने या पर्यटनासाठी प्रतीव्यक्ती 250 अधिक जीएसटी आकारणी सुरू केली आहे. याबाबत पर्यटकांना रितसर पावती देण्यात येत आहे. या कर आकारणीवर पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पर्यटक गुगल मॅपवर धबधब्यांचे फोटो पाहून पर्यटनासाठी येत आहेत. याबाबत कणकुंबी वलयाचे वनाधिकारी संतोष म्हणाले की, जांबोटी ते चोर्ला हा भाग घनदाट जंगलाने व्यापला असून या ठिकाणी पर्यटनास जाणे धोकादायक आहे. कोणताही अनुचित प्रकार अथवा जंगली प्राण्यांचे हल्ले होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी पुढील आठ दिवसात फक्त चिखले आणि सडा या दोनच ठिकाणी पर्यटकांना यापुढे प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच यापुढे वनखात्याच्या वेबसाईटवर बुकींग करून रितसर प्रवेश फी भरल्यानंतरच या ठिकाणी पर्यटकांना प्रवेश दिला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.









