संजय शिंदगी यांच्या स्मरणार्थ सरस्वती वाचनालयात आयोजन
प्रतिनिधी /बेळगाव
सरस्वती वाचनालय, शहापूरच्या संगीत कला मंचतर्फे संजय शिंदगी यांच्या स्मरणार्थ आषाढी द्वादशीनिमित्त ‘रंग पंढरी’ हा संगीत कार्यक्रम सोमवारी वाचनालयाच्या माई ठाकुर सभागृहात पार पडला. यामध्ये अर्चना बेळगुंदी, सुनीता देशपांडे, नम्रता कुलकर्णी यांनी ‘देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी, चल ग सखे पंढरीला, सुंदर ते ध्यान, टाळ बोले चिपळीला, अवघे गरजे पंढरपूर, खेळ मांडियेला’ यासह अनेक गीते सादर केली.
‘कानडा राजा पंढरीचा’ या गीतानंतर पंढरी निवासा, काया ही पंढरी, तीर्थ विठ्ठल, माझे माहेर पंढरी, अणु रेणू या तोकडा, या रे नाचा अवघे जण, ही मेलडी सादर केली. देवाचिये द्वारी क्षण भर उभा राहिलो तरी विठूराया ‘हेचि दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा’ अशीच आळवणी गायिकांनी केली. या कार्यक्रमाचे निवेदन वाचनालयाच्या अध्यक्षा स्वरुपा इनामदार यांनी केले.
कलाकारांना तबल्याची साथ विशाल मोडक, संवादिनीची साथ सारंग कुलकर्णी, टाळाची साथ महाबळेश्वर साबण्णावर यांनी केली. प्रारंभी सुहास सांगलीकर, सुभाष इनामदार, विजय देशपांडे तसेच सर्व कलाकार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी स्वाती व शिरीष शिंदगी यांचा सत्कार करण्यात आला. कलाकारांचा परिचय स्वरुपा इनामदार यांनी करून दिला. या कार्यक्रमाला श्रोत्यांची लक्षणीय उपस्थिती होती.









