पुरेशा बंदोबस्ताअभावी प्रवासी त्रस्त: सहा तास वाहतूक ठप्प
वार्ताहर /आंबोली
आंबोलीत रविवारी पर्यटकांनी तुफान गर्दी केली होती. दुपारनंतर अचानक उसळलेल्या गर्दीमुळे घाटातील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. हजारो पर्यटकांवर पोलिसांचे नियंत्रण नसल्यामुळे वाहने अस्ताव्यस्त पार्क करून ठेवण्यात आली. त्यामुळे वाहतुकीची कोंडी झाली. त्यातून पर्यटकांमध्ये शाब्दिक बाचाबाची व हाणामारीच्या घटना घडल्या. रविवारी आंबोलीत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात पोलीस यंत्रणा कुचकामी ठरली. त्यामुळे हा प्रसंग ओढवला.
दरम्यान, आषाढी एकादशी आणि ईदनिमित्त जिल्हय़ात अन्यत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. त्यामुळे आंबोलीत पोलीस कुमक कमी पडली. परिणामी वाहतूक कोंडी झाल्याचे पोलीस यंत्रणेकडून मान्य करण्यात आले.
आंबोलीत यंदाच्या हंगामात प्रथमच एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पर्यटकांची गर्दी झाली होती. त्यामुळे घाटात तब्बल सहा तास वाहतूक कोंडीत एसटी प्रवासी, वाहन चालकांना अडकून पडावे लागले. सायंकाळी साडेसहानंतर वाहतूक कोंडी सोडविण्यात पोलीस यंत्रणेला यश आले.
गेल्या रविवारीही पर्यटकांनी गर्दी केली होती. मात्र, पोलीस कुमक जादा होती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली नाही. रविवारी आषाढी एकादशी आणि ईद असल्यामुळे आंबोलीत एरवी शनिवार-रविवारी पावसाळी पर्यटन हंगामात 100 ते 120 पोलीस अधिकाऱयांसह कर्मचारी तैनात असतात. मात्र, रविवारी केवळ 50 ते 60 पोलीस तैनात होते. आंबोलीत घाटात धबधब्याच्या ठिकाणाबरोबरच कावळेसाद पॉईंट, हिरण्यकेशी, महादेवगड पॉईंट, बाजारपेठ या ठिकाणी पोलीस तैनात करावे लागतात. रविवारी पोलीस कुमक कमी असल्याने त्याचा परिणाम समोर आला. पोलिसांना पर्यटकांवर नियंत्रण ठेवता आले नाही. वाहने कशीही लावण्यात आली. त्यामुळे वाहन चालकांना मार्ग काढणे शक्य झाले नाही. त्याचा परिणाम वाहतूक कोंडीत झाला. त्यातून पर्यटकांत शाब्दिक बाचाबाची आणि हाणामारी झाली. पर्यटकांनी हुल्लडबाजीही केली.
आंबोलीत यापुढे पोलीस बंदोबस्त वाढविणार!
आंबोली मुख्य धबधबा व परिसरात रविवारी झालेल्या वाहतूक कोंडीची जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी दखल घेत यापुढे अधिक पोलीस बंदोबस्त वाढवून वाहतूक कोंडी किंवा हुल्लडबाजी होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे स्पष्ट केले.









