लोकमान्य सामाजिक-सांस्कृतिक केंद्रातर्फे ‘देव वाणी-मंगल गाणी’ संगीताचा कार्यक्रम उत्साहात

प्रतिनिधी /बेळगाव
भेटीलागी जीवा लागलीसे आस ।
पाहे रात्री दिवस वाठ तुझी…।
या अभंगातून भाविकाला लागलेली पांडुरंगाच्या भेटीची आस दिसून येते. बेळगावच्या स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या अभंगवाणीतून विठुरायाच्या अनेक रुपांचे दर्शन घडविले. आषाढी एकादशीला पंढरपूरला जाता आले नसले तरी भक्तीगीतांमधून पांडुरंगाचे दर्शन घडल्याने रसिकश्रोते भक्तीरसात तृप्त होऊन गेले.
आषाढी एकादशीनिमित्त रविवारी लोकमान्य सामाजिक व सांस्कृतिक केंद्र बेळगाव प्रस्तूत व रसिकरंजन बेळगावनिर्मित ‘देव वाणी-मंगल गाणी’ हा नाटय़भक्ती आणि संगीताचा अप्रतिम असा संगीताचा कार्यक्रम पार पडला. कानडी भागातून बेळगाव भागात येणारी एक दिंडी रात्रीच्यावेळी मुक्कामाला थांबते. रात्रीच्यावेळी हरिनामाचा गजर सुरू होतो आणि एकेक अभंग व रचना सादर केली जाते अशी या कार्यक्रमाची रूपरेषा होती. संवाद, नाटय़, भक्तीगीत असा अप्रतिम मिलाफ बेळगावकर रसिकांना रविवारी अनुभवता आला.
गीतांमधून आळविला भक्तीचा सूर
‘देव वाणी-मंगल गाणी’ प्रवाही नाटय़ाची सुरुवात नाटय़स्वरूपात झाली. ‘रूप पाहता लोचणी’ या भक्तीगीताने संपूर्ण सभागृह भक्तीच्या सुरात न्हाऊन निघाले. त्यानंतर खेळ मांडियेला, कानडावू विठ्ठलू या तुकाराम व ज्ञानेश्वर महाराजांच्या रचनांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. विठ्ठल जितका मराठी प्रांताला आपलासा वाटतो तितकाच तो कानडी प्रांतालाही आपलासा वाटतो, पुरंदरदासासारख्या श्रे÷ संतांनी कानडीमध्ये ‘देव बंदा नम्म ’हा अभंग रचून विठुरायाची केलेली स्तुती सादर केली. देवा तुझा मी सोनार, मुंगी उडाली आकाशी, माझे माहेरं पंढरी, विठू माझा लेकुरवाळा, रंगा येई वो, पद्मनाभा नारायणा, अरे कृष्णा अरे कान्हा अशा सुमधूर अभंगांमधून विठ्ठलाच्या पंढरपूर नगरीचे दर्शन घडविण्यात आले.
कार्यक्रमाचे लेखन व दिग्दर्शन प्रा. अनिल चौधरी यांनी केले. प्रसाद शेवडे, चैतन्य गोडबोले, श्रीवत्स हुद्दार, तन्मयी सराफ, सानिका ठाकुर, सोनाली पाटील, अब्दुल रहिम सिद्दीकी, रिहान मुल्ला यांनी एकापेक्षा एक सरस अशी भक्तीगीते आपल्या मधूर स्वरांनी सादर केली. त्यांना तितक्मयाच तोडीची संगीत साथ लाभली. नारायण गणाचारी यांनी तबला साथ, पखवाज विकास नर, दर्शन घाडीगावकर व प्रसाद गावडे यांनी टाळ व चिपळी साथ दिली. प्रसाद शेवडे यांनी गायनासोबतच अप्रतिम अशी ऑर्गन साथ दिली.
दिंडीतून भक्तीरसाचे दर्शन
रामलिंगखिंड गल्ली येथील टिळक चौकापासून विठुरायाची दिंडी काढण्यात आली. टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तीरसात तल्लीन होऊन वारकरी, भाविक या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. लहान मुलांपासून वयस्करांनीही डोक्मयावर टोपी व अंगावर पांढरे कपडे परिधान करून चिंब पावसात विठुरायाचा गजर केला. डोक्मयावर तुळशी घेऊन महिला विठुनामाचा जप करीत होत्या. लोकमान्य सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांच्या हस्ते आरती करून दिंडीला सुरुवात झाली. दिंडीमध्ये लोकमान्यचे व्हा. चेअरमन अजित गरगट्टी, संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे यासह लोकमान्य समुहातील कर्मचारी उपस्थित होते.









