त्वरित दुरूस्त करण्याची ट्रॉलर मालक संघटनेची मागणी
प्रतिनिधी /वास्को
पन्नास वर्षांपूर्वी उभारण्यात आलेली वास्को खारवीवाडा येथील मच्छीमारी जेटी धोक्यात आलेली असून तीची तातडीने दुरूस्ती करावी अशी मागणी माजीमंत्री व गोवा मच्छीमारी बोट मालक संघटनेचे अध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा यांनी केली आहे. ही जेटी कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.
वास्कोत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना जुझे फिलीप व त्यांच्या पदाधिकाऱयांनी खारवीवाडा येथील जेटीच्या परिस्थितीबाबत माहिती दिली. ही मच्छिमारी जेटी पन्नास वर्षांपूर्वी स्थानिक मच्छीमारांची तात्पुरती सोय म्हणून बांधण्यात आली होती. मात्र, मच्छीमार आजही त्याच जेटीचा वापर करीत आहेत. या जेटीची स्थिती सध्या कमकुवत झालेली आहे. ही जेटी आतून पोकळ बनलेली आहे. ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या जेटीकडे दुर्लक्ष झाल्यानेच तीची ही अवस्था झालेली आहे. एखादी दुर्घटना घडल्यास सरकारच या परिस्थितीला जबाबदार राहिल असे जुझे फिलीप यांनी म्हटले आहे.
पन्नास वर्षांपूर्वीची ही जेटी आता कालबाहय़ झालेली आहे. आता ट्रॉलरांच्या आकारात आणि स्वरूपातही बदल झालेला आहे. ट्रॉलरांची संख्याही वाढलेली आहे. मात्र, जेटीचा आकार तोच आहे. तीची स्थितीही वाईट राहिलेली आहे. खारवीवाडय़ावरील या जेटीची लांबी पन्नास मिटर आहे. तर या जेटीवर 250 मच्छिमारी ट्रॉलर अवलंबून आहेत. मासळी उतरविण्यासाठी एकाच वेळी केवळ दहा ते बारा ट्रॉलर जेटीवर नांगरले जाऊ शकतात. त्यामुळे ट्रॉलरांचा बराच वेळ वाया जातो. त्यांना ताटकळत राहावे लागते. या गैरसोयीमुळे मच्छीमारांना नुकसानीला सामोरे जावे लागते. या वाईट अवस्था झालेल्या जेटीवर नांगरलेले ट्रॉलर वारंवार जेटीच्या कडांना आदळत असतात. त्यामुळे ट्रॉलरांचीही हानी होते. वारंवार दुरूस्ती खर्च करावा लागतो. अशा परिस्थितीमुळे काही ट्रॉलर मालकांनी या व्यवसायीतूनच माघार घेतलेली आहे. सरकारने या परिस्थितीची दखल घ्यावी आणि वास्को खारवीवाडय़ावरील दुर्लक्षीत मच्छीमारी जेटीची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी जुझे फिलिप डिसोजा व त्यांच्या पदाधिकाऱयांनी केली.









