वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त केंद्र शासनाने प्रदर्शनीय क्रिकेट सामना आयोजित करण्याचा प्रस्ताव भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाकडे पाठविला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली असल्याने हा स्वातंत्र्यदिन मोठय़ा प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे.
सदर प्रदर्शनीय क्रिकेट सामना 22 ऑगस्ट रोजी भारत आणि शेष विश्व संघामध्ये भरविण्यात यावा, असे सरकारला वाटते. भारताच्या सांस्कृतिक आणि कला मंत्रालयातर्फे या प्रदर्शनीय क्रिकेट सामन्याच्या प्रस्तावासंदर्भात भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱयांसमवेत बोलडणी चालू आहेत. या प्रदर्शनीय सामन्यात भारताचे आघाडीचे क्रिकेटपटू तसेच विदेशातील क्रिकेटपटूंचाही सहभाग राहिल. ‘आझादी का अमृत महोत्सव’ मोहिमेअंतर्गत हा सामना खेळवला जाणार आहे. या प्रस्तावावर अद्याप चर्चा चालू असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना या सामन्यात खेळण्यासाठी संपर्क साधण्याची प्रक्रिया सुरू आहे.
इंडिया एकादश आणि विश्व एकादश यांच्यात हा प्रदर्शनीय क्रिकेट सामना 22 ऑगस्ट रोजी खेळविण्याचा प्रस्ताव शासनाकडून ठेवण्यात आला आहे. या सामन्यासाठी किमान 13-14 आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंना निमंत्रण देण्याची जरूरी आहे. त्याचप्रमाणे या सामन्यासाठी ते उपस्थित राहतील किंवा नाही याची दखल घेणे जरुरीचे आहे. सध्या इंग्लिश क्रिकेट हंगाम सुरु असून कॅरेबियन प्रिमियर लिगला लवकरच प्रारंभ होत आहे. 22 ते 26 जुलै दरम्यान बर्मिंगहम येथे होणाऱया आयसीसीच्या वार्षिक परिषदेवेळी भारतीय क्रिकेट मंडळाचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. या परिषदेवेळी विविध देशांच्या क्रिकेट मंडळांच्या सदस्यांसमवेत या प्रदर्शनीय क्रिकेट सामन्याबाबत खेळाडूंसाठी चर्चा केली जाईल, असे सांगण्यात आले.
भारतीय क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा 20 ऑगस्टला संपणार आहे. या दौऱयात कोहली, रोहित शर्मा आणि पंत सहभागी होणार नाहीत. त्यामुळे हे खेळाडू प्रदर्शनीय सामन्यासाठी उपस्थित राहू शकतील. लंकेमध्ये 27 ऑगस्टपासून सुरु होणाऱया आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ लंकेत दाखल होणार आहे.









