राष्ट्रपती बुधवारी राजीनामा देणार ः नव्या सत्तास्थापनेपर्यंत परिस्थिती नियंत्रणाचे आव्हान
कोलंबो / वृत्तसंस्था
श्रीलंकेतील आर्थिक संकटाने आता भयानक रूप धारण केले आहे. आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावर कब्जा केला असतानाच पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांचे निवासस्थानही जाळण्यात आले आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे बुधवारी राजीनामा देणार असून देशात नेतृत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ते 5 जुलैपासून बेपत्ता असून सुटकेससह पळून गेल्याचा दावाही केला जात आहे. तसेच पंतप्रधानांनी राजीनामा दिल्याने अराजकाची स्थिती निर्माण झाली आहे. पेट्रोल-डिझेलसह जीवनावश्यक वस्तू मिळविण्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागत आहे.
श्रीलंकेत राजकीय पोकळी निर्माण झाली आहे. म्हणजेच श्रीलंकेचा राष्ट्राध्यक्ष कोण, याबाबत बरीच अनिश्चितता आहे. श्रीलंकेत सुरू असलेल्या आर्थिक आणि राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री धम्मिका परेरा यांनीही रविवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या दोन महिन्यांत पदाचा राजीनामा देणारे धम्मिका हे चौथे मंत्री आहेत. दुसरीकडे लष्करप्रमुख शवेंद्र सिल्वा यांनी देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी लोकांनी सुरक्षा दल आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.
श्रीलंकेतील आर्थिक आणि राजकीय संकटाचा निषेध करणाऱया निदर्शकांनी शनिवारी पंतप्रधानांच्या खासगी घराला आग लावली. मात्र, आता पोलिसांनी पंतप्रधानांचे घर पेटवून दिल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण सुरू असताना पोलिसांनी लोकांचे कॅमेरे जबरदस्तीने बंद केले, असेही सांगण्यात येत आहे.
राष्ट्रपती गोटाबाया अज्ञातवासात
राष्ट्रपती भवनावर लोकांचा ताबा घेतल्यानंतर दबाव वाढत असताना पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी पदाचा राजीनामा दिला. सोशल मीडियावर त्यांनी ही माहिती दिली. राजीनामा देण्यापूर्वी पंतप्रधानांनी घेतलेल्या आपत्कालीन बैठकीत विधानसभा अध्यक्ष महिंदायप्पा अभयवर्धने यांना हंगामी राष्ट्रपती बनवण्याचा प्रस्ताव होता. श्रीलंकेच्या घटनेनुसार राष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यास सभापती एका महिन्यासाठी अंतरिम राष्ट्रपती होऊ शकतात. राष्ट्रपतींनी राजीनामा दिल्यानंतर एक महिन्याच्या आत नवीन राष्ट्रपती निवडला जाणे आवश्यक आहे. 13 जुलै रोजी गोटाबाया यांनी राजीनामा दिल्यास श्रीलंकेला 13 ऑगस्टपर्यंत नवीन राष्ट्रपती निवडावा लागेल. तथापि, श्रीलंकेतील राष्ट्रपती निवासस्थान आंदोलकांनी ताब्यात घेतल्यानंतर गोटाबाया कुठे गायब झाले? हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
राष्ट्रपतींच्या निवासात कोटय़वधींचे घबाड
श्रीलंकेतील सरकारविरोधी निदर्शकांनी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या अधिकृत निवासस्थानावर लोकांनी कब्जा केल्यानंतर तेथे कोटय़वधी रुपयांची रोख रक्कम सापडल्याचा दावा केला जात आहे. यासंबंधी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात आंदोलक नोटा मोजताना दिसत आहेत. डेली मिरर या वृत्तपत्राने वृत्त दिले आहे की जप्त केलेले पैसे सुरक्षा युनिट्सकडे सुपूर्द करण्यात आले आहेत.
पेट्रोल-डिझेलसाठी वाहनांच्या रांगा
श्रीलंकेतील आर्थिक संकटामुळे लोकांची अवस्था वाईट आहे. पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा पाहायला मिळतात. श्रीलंकेत 1 जुलै 2019 रोजी पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 160 रुपये इतकी होती. हा दर आता 550 रुपये प्रतिलिटर झाला आहे. त्याचबरोबर डिझेलची किंमतही 3 वर्षात 180 रुपये प्रतिलिटरवरून 520 रुपये प्रतिलिटर झाली आहे. तरीही इंधन दरवाढीचा भार सहन करत लोक पेट्रोलपंपांवर वाहनांच्या रांगा लावून खरेदी करताना दिसत आहेत.
सर्वपक्षीय सरकार स्थापनेसाठी प्रयत्न
सर्वपक्षीय सरकारच्या स्थापनेवर एकमत होण्यासाठी श्रीलंकेतील मुख्य विरोधी पक्ष विशेष पक्षाची बैठक बोलावू शकतात. विरोधी पक्षनेते सजीथ प्रेमदासा, श्रीलंका मुस्लीम काँग्रेस नेते रौफ हकीम, तमिळ पुरोगामी आघाडीचे नेते मनो गणेशन आणि ऑल सिलोन मक्कल काँग्रेसचे नेते समगी जना बालवेगया बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी, उदयोन्मुख राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी रविवारी नॅशनल फ्रीडम प्रंटसह नऊ पक्षांच्या नेत्यांची आणखी एक बैठक आयोजित केली होती. सर्वपक्षीय सरकारबाबत दीर्घ चर्चा होणार असल्याचे श्रीलंकेच्या कम्युनिस्ट पक्षाचे उपाध्यक्ष वीरसुमना वीरसिंघे यांनी सांगितले.
श्रीलंकेला यापुढेही मदतीची तयारी ः एस जयशंकर
श्रीलंकेत सुरू असलेल्या निदर्शनांबाबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी निवेदन जारी केले आहे. आम्ही श्रीलंकेला खूप पाठिंबा दिला आहे. आम्ही मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यांच्या समस्येवर ते काम करत आहेत. आतापर्यंत निर्वासितांशी संबंधित कोणतीही समस्या नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या गंभीर संकटात काँग्रेस श्रीलंका आणि तेथील जनतेच्या पाठीशी असल्याचे वक्तव्य केले आहे.









