प्रतिनिधी/ पणजी
सेवेत परत घ्या, या मागणीसाठी गेल्या कित्येक दिवसांपासून येथील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण करणाऱया अंगणवाडी सेविकांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. काल शनिवारी विद्या नाईक यांना तातडीने गोमेकॉत भरती करण्यात आले आहे.
शनिवारी सकाळी 11.30 च्यासुमारास विद्या नाईक यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णवाहिका बोलविण्यात आली होती. आझाद मैदानावर त्यांची प्राथमिक तपासणी केली असता तिची प्रकृती गंभीर दिसल्याने त्यांना तातडीने गोमेकॉत भरती करण्यात आले. त्यांचा रक्तदाब कमी झाला होता व मधुमेहीचाही तिला त्रास जाणवत होता. गेल्या 16 दिवसांपासून पोटात अन्न नसल्यामुळे उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीवर परिणाम होऊ लागला आहे. सरकारने याची त्वरित दखल घ्यावी आणि सेविकांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी होत आहे.
तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार ः तामसे
दरम्यान, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सांगण्यावरून आमच्याकडून स्वाक्षरी घेण्यासाठी प्रतिज्ञापत्र पाठविण्यात आले होते. मात्र त्यातही काही ठोस असे नव्हते तर सगळी सरकारची मनमानी होती. आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसून कोणत्याही राजकीय पक्षाच्या सांगण्यावरून आम्ही उपोषण करीत नाही. ही आमच्या हक्काची लढाई आहे. सरकार जोपर्यंत आम्हाला बिनशर्थ सेवेत रुजू करून घेत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरुच राहणार, असे देवयानी तामसे यांनी सांगितले.
आमची विनाकारण सतावणूक केली जात आहे. कोणतेही कारण नसताना आम्हाला सेवेतून कमी करण्यात आले आहे. केपे आणि धारबांदोडा केंद्रावर दुसऱया सेविकांची नेमणूक करण्यात आली आहे. राज्यातील विद्यमान सरकार हे सर्वसामान्यांचे नाही. सर्वसामान्य लोकांना देशोधडीला लावून सरकार कोणते सुख मिळवत आहे. कोणतेही कारण नसताना सात सेविकांना सेवेतून कमी करण्यात आले. या सात सेविकांपैकी काही जणांचे कुटुंब त्यांच्यावर अवलंबून आहे. त्यांना जे काही मानधन मिळत होते त्याच्यावर त्या संसाराचा गाडा चालवित होत्या. आता त्यांची स्थिती बिकट झाली असून घरातील जे काही सोन्याचे दागिने होते ते गहाण ठेवून त्यांचे कुटुंबीय दिवस ढकलत आहेत. काहीजणांची मुले शाळेत जातात त्यांचा खर्च कसा पेलवेल, असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाले आहे. सरकार या गोष्टींचा विचार का करीत नाही. सेवेतून सहजपणे कमी करण्यात आले मात्र त्यांचे पुढे काय होईल याचा विचार कुणीच केला नाही. हेच सर्वसामान्य लोकांचे सरकार की काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.









