प्रतिनिधी /म्हापसा
मयडे येथील नागरिक तथा पंच सदस्य महेश साटेलकर व रामा साटेलकर यांच्यावतीने गावातील शेतकरी बंधूना स्वहस्ते मोफत खताचे वाटप करण्यात आले. साटेलकर गेली अनेक वर्षे समाजसेवेच्या स्वरुपात गावातील नागरिकांना खताचे तसेच बियाण्याचे वाटप करीत असतात. यामागे कोणताही स्वार्थ नसून शेतकऱयांनी आपली शेती पडीक न ठेवता मोठय़ा प्रमाणात शेती व्यवसाय करावा हाच यामागचा हेतू आहे अशी माहिती समाजसेवक महेश साटेलकर यांनी या कार्यक्रमांतर्गत बोलताना दिली.
यावेळी गावातील होतकरू ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. महेश साटेलकर म्हणाले, आपल्या परीने जी काही शेतकऱयांना मदत पाहिजे ती आपण करणार आहे. हे खत मयडे गावातील नागरिकांना घरोघरी मिळणार आहे. प्रत्येक घरात 50 किलोची एक बॅग देतो. मयडेत अशा 400 बॅग खत मोफत देतो अशी माहिती यावेळी साटेलकर यांनी दिली.
माजी पंच रामा साटेलकर म्हणाले, आम्ही शेतकऱयांसाठी सदैव झटतो. खूप कष्ट घेतो. आज महागाई वाढलेली आहे. कामगार वर्ग मिळत नाही. अशात शेती कुणीही करू पाहत नाही म्हणून शेतकऱयांना आधार देण्यासाठी आम्ही मोफत खत व बियाणे दरवर्षी देतो. यावेळी ग्रामस्थ रमेश वळवईकर यांनीही आपले विचार व्यक्त करीत साटेलकर कुटुंबियांचे अभिनंदन केले व त्यांच्या या शेतकऱयांच्या सेवेबद्दल आभार व्यक्त केले.









