धबधबे प्रवाहित, पर्यटकांचा ओघ सुरू, सावधगिरी बाळगणे आवश्यक

प्रतिनिधी /बेळगाव
मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढल्याने धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. मात्र, अलीकडे सेल्फीची पेझ वाढली आहे. त्यामुळे हीच सेल्फी आपला जीव घेऊ शकते. त्यामुळे पर्यटकांनी धबधब्यांच्या ठिकाणी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
बेळगावपासून जवळ असलेले गोकाक, गोडचिनमलकी, आंबोली, तिलारी, सुंडी, किटवाड आदी धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा ओढा वाढत आहे. पावसात भिजण्याबरोबरच धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी धबधब्यांच्या स्थळी गर्दी वाढू लागली आहे. मात्र, हा अतिउत्साह जीवघेणा ठरू शकतो. यामध्ये तरुण-तरुणींचा समावेश अधिक आहे. उत्साहाच्या भरात सेल्फी घेणे, स्टंटबाजी करणे किंवा अगदी धबधब्याच्या कठडय़ावर सेल्फी काढणे यामुळे मोठय़ा दुर्घटना घडू शकतात. यापूर्वी अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे पर्यटकांनी सावधगिरीने धबधब्यांचा आनंद लुटणे आवश्यक आहे.
आंबोली आणि तिलारी येथील धबधबे प्रवाहित झाले आहेत. त्याचबरोबर येथील घाटमाथ्यावर काही धोकादायक ठिकाणे आहेत. या ठिकाणी तरुण-तरुणी सेल्फी काढण्याचे प्रकार वाढले आहेत. यातूनच दुर्घटना घडत आहेत. शिवाय बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर धबधबे पाहण्यासाठी जाणाऱया वाहनधारकांची संख्या वाढली आहे. दरम्यान, काही तरुण स्टंटबाजी करून वाहने चालवत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे लहान-सहान अपघातही वाढत आहेत.
शनिवारी, रविवारी आणि सुटीच्या दिवशी धबधब्यांवर गर्दी वाढू लागली आहे. दरम्यान, काही तरुण मद्यधुंद अवस्थेत हुल्लडबाजी करताना दिसत आहेत. त्यामुळे पाय घसरणे, तोल जऊन पडणे आणि इतर कारणांमुळे जीवघेण्या घटना घडत आहेत. त्यामुळे धबधब्यांचा आनंद लुटणाऱया पर्यटकांनी जागरुक आणि सावधगिरीने राहणे आवश्यक आहे.









