नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने 18 वर्षांवरील लोकांसाठी कोरोना लसीच्या खबरदारीच्या डोसमधील (प्रिकॉशन किंवा बुस्टर डोस) अंतर 9 महिन्यांवरून 6 महिन्यांपर्यंत कमी केले आहे. 18 ते 59 वयोगटातील सर्व लोकांना आता 9 महिन्यांऐवजी 6 महिन्यांनी बूस्टर/प्रिकॉशन डोस दिला जाईल, असे सरकारकडून सांगण्यात आले. सरकारच्या लसीकरणावरील सल्लागार संस्था असलेल्या नॅशनल टेक्निकल ऍडव्हायझरी ग्रुप ऑन इम्युनायझेशनने (एनटीएजीआय) या दुसऱया आणि बूस्टर डोसमधील अंतर कमी करण्याची शिफारस केली होती.
कोरोनापासून बचाव करण्यासाठी आतापर्यंत बूस्टर डोस घेण्यासाठी 9 महिने वाट पाहावी लागत होती. मात्र सरकारच्या या निर्णयानंतर दुसरा डोस घेऊन सहा महिने पूर्ण झालेल्यांनाही आता बूस्टर डोस मिळू शकेल. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि प्रशासन यांना लिहिलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी यासंबंधी सविस्तर माहिती जारी केली आहे. त्यानुसार दुसऱया डोसच्या तारखेपासून 6 महिने किंवा 26 आठवडे पूर्ण झाल्यानंतर 18-59 वर्षे वयोगटातील नागरिक खासगी कोविड लसीकरण केंद्रांमध्ये जाऊन बूस्टर डोस घेऊ शकतो, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय ‘एनटीएजीआय’ने 12 वर्षांखालील मुलांसाठी लसीकरणासाठी शिफारसी देखील दिल्या आहेत. 12-17 वयोगटातील लसीकरण कमी झाले असल्याने ते वाढविण्यासाठी काही सूचना करण्यात आल्या आहेत. या वयोगटातील लोकांना 12 वर्षे वयोगटातील लोकांपेक्षा जास्त धोका असतो. तथापि, बूस्टर म्हणून कोर्बेव्हॅक्सचा वापर करण्यावर ‘एनटीएजीआय’कडून अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही.
आतापर्यंत 198 कोटींहून अधिक डोस
देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत आत्तापर्यंत 198 कोटी 20 लाख 86 हजार 763 डोस देण्यात आले आहेत. हे देशव्यापी कोविड-19 लसीकरण 16 जानेवारी 2021 रोजी सुरू झाले. त्यानंतर लसीकरणाच्या सार्वत्रिकीकरणाचा नवीन टप्पा 21 जून 2021 रोजी सुरू झाला. लसीकरण मोहिमेसाठी अधिकाधिक लसी उपलब्ध करणे, राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पद्धतशीर नियोजन करणे आणि लस पुरवठा साखळी सुव्यवस्थित करणे याद्वारे मोहिमेला वेळोवेळी गती देण्यात आल्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. तसेच यापुढील काळातही केंद्र सरकार लसीकरणाची गती आणि व्याप्ती वाढवण्यासाठी वचनबद्ध असल्याचे नमूद करण्यात आले आहे.









