प्रक्षोभक विधाने करून धार्मिक भावना भडकाविल्या
जयपूर / वृत्तसंस्था
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा जो शिरच्छेद करेल त्याला आपले राहते घर देऊ अशी जाहीर घोषणा करणाऱया अजमेर दर्ग्याच्या अधिकाऱयाला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. सलमान चिस्ती असे त्याचे नाव असून त्याच्यावर अनेक गुन्हे यापूर्वीच नोंद आहेत. मंगळवारी रात्री त्याने शर्मा यांची हत्या करण्याचे आवाहन मुस्लिमांना केले होते. त्यानंतर त्याला अटक झाली.
चिस्ती याच्यावर धमकी देणे, खुनाचा प्रयत्न करणे, गोळीबार करणे, जखमी करणे, भीती निर्माण करणे असे अनेक गुन्हे नोंद आहेत. यांपैकी बहुतेक प्रकरणे अजमेर दर्गा पोलीस स्थानकात नोंद असल्याची माहिती देण्यात आली. ‘ख्वाजा साहेबांच्या दरबारातून हा संदेश देण्यात आला आहे, असे आवाहन चिस्तीने केल्याचे त्याने प्रसिद्ध केलेल्या व्हिडीओतून दिसत आहे.
शर्मा यांच्या हत्येचे आवाहन करणारा त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यातून मोठा सामाजिक तणाव निर्माण होण्याची शक्यता दिसू लागल्याने त्याला अटक करण्यात आली. या दर्ग्याचे दिवाण (व्यवस्थापक) सय्यद झैनुल अबेदिन यांनी चिस्ती याची निंदा केली असून हा व्हिडीओ विकृत असल्याचे विधान केले आहे.
कन्हैयालाल घटनेशी साधर्म्य
काही दिवसांपूर्वी राजस्थानातील उदयपूर येथे कन्हैयालाल तेली या हिंदू व्यक्तीची गळा चिरुन निर्घृण हत्या करण्यात आली होती. मारेकरी रियाझ अत्तारी आणि घौस मोहम्मद यांनीही तेली यांच्या हत्येपूर्वी असाच व्हिडीओ प्रसारित केला होता आणि हत्येची धमकी दिली होती. तेली यांनी नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ संदेश प्रसारित केल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली होती.









