दत्तक 16 मुलांचे बदलले जीवन; आता 21 मुलांचे पालकत्व स्वीकारून संपूर्ण शिक्षण पूर्ण करणार
संग्राम काटकर कोल्हापूर
आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यापासून ते त्यांना रोजगाराला लावण्यासाठी गेल्या 18 वर्षापासून हर्षनील मानवसेवा प्रतिष्ठानची धडपड सुरु आहे. या दीड दशकाच्या कालावधीत प्रतिष्ठानने 16 मुलांचं लोकसहभागातून पोटच्या पोरासारखं शिक्षण पूर्ण करुन त्यांना उद्योगक्षेत्रात रोजगाराला लावलं आहे. आता 21 मुलांचं जीवन घडवण्याचा व्रत प्रतिष्ठानने स्वीकारले आहे. हे व्रत पूर्ण करण्यासाठी मुलांचं संपूर्ण पालकत्वच स्वीकारण्याचे ठरवले आहे. त्यानुसार मुलांचा शिक्षण पूर्ण करुन त्यांना रोजगार मिळवून देण्याचे नियोजन आहे. यासाठी प्रतिष्ठानचे संस्थापक शशांक भागवत, प्रतिष्ठानचे अध्यक्ष हर्षल भागवत व कार्यवाह निखिल भागवत व जनसंपर्क अधिकारी अनिलकुमार रेड्डी या तिघांनी जिल्हा परिषद शाळांमधील मुलांचा शोध सुरु ठेवला आहे.
दोन दशकांपूर्वी शशांक भागवत व त्यांच्या पत्नी (कै.) शितल भागवत यांनी आंबेडकर गल्ली, कळंबा येथील आपल्या घरीच हर्षनील मानवसेवा प्रतिष्ठानची स्थापना केली. ही स्थापना करत असताना गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवला. त्यानुसार शोधाशोध करुन गरीब कुटुंबातील पालकांशी संपर्क साधून आम्ही तुमच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांचं शिक्षण पूर्ण करणार असल्याचं पटवून दिली. पालकांनी ही भागवत दांपत्यावर विश्वास ठेवून आपली मुलं भागवत दांपत्याच्या स्वाधीन केली. टप्प्या-टप्प्याने मिळत राहिलेल्या मुलांची संख्या सोळापर्यंत गेली. या दत्तक घेतलेल्या 16 मुलांना भागवत दांपत्याने आपल्या घरीच निवारा देऊन त्यांना लळा लावला. त्यांना पोटाशी लावून शिक्षणासाठी येणारा सर्व खर्च भागवण्याची जबाबदारी स्वीकारली. बऱ्याचदा पदरचे आणि लोकसहभागातून उभा केलेले पैसे मुलांच्या शिक्षणावर खर्ची घालून सर्वांचे शिक्षण पूर्ण केले. इतकेच नव्हे तर काही मुलांना त्यांच्यातील गुणवत्तेनुसार उद्योग क्षेत्रात नोकरीला लावले तर काही मुलांना त्यांच्यातील कौशल्यानुसार रोजगार काढून देऊन स्वतःच्या पायावर उभा केले. कालांतराने ही मुल आपला चरितार्थ स्वतःतून चालू शकतात, कुटुंबीयाचा आधार बनू शकतात हे समजून घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडं पाठवण्यात आले. वैशिष्ठ्य म्हणजे या कमवत्या झालेल्या सर्व मुलांमुळे त्यांच्या घरच्या आर्थिक परिस्थितीत चांगली सुधारणा झाली आहे.
आता प्रतिष्ठानने आपल्याकडील मुळच्या 6 आणि नवीन 15 अशा 21 आर्थिक दुर्बल कुटुंबातील शिक्षण घेत असलेल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करुन त्यांनाही कमवत करण्याचा निर्धार केला आहे. हा निर्धार करताना मुलांना दत्तक घेण्याऐवजी त्यांचे पालकत्व स्वीकारण्याचे प्रतिष्ठानने ठरवले आहे. एकदा का मुलांचे पालकत्व स्वीकारले की मुले ज्या इयत्तेत सध्या शिकत आहे, तेथून ते पुढील संपूर्ण शिक्षण पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती सर्व शैक्षणिक मदत केली जाणार आहे. शिवाय समाजातील इतर पालकांप्रमाणे सर्व मुलांना सणवाराला कपडय़ांसह अन्य गरजेच्या वस्तू घेऊन दिल्या जाणार आहेत. मुलांमध्ये व्यवहारज्ञान विकसित करण्यासाठी सुट्टीच्या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यावरही भर दिला जाणार आहे. भविष्यात जेव्हा केव्हा ही मुले शिक्षण पूर्ण करतील, तेव्हापासून त्यांना त्यांच्या गुणवत्तेनुसार रोजगार मिळवून देण्याच्या हालचाली सुरु केल्या जाणार आहे.
गरजू मुलांची नावे सुचवा…
आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुले शिक्षणाच्या प्रवाहात फारशी राहत नाहीत. शिवाय एक पालक अथवा आई-वडील नसलेल्या मुलांना शिक्षण घेताना मोठा संघर्ष करावा लागतो. तेव्हा समाजातील जाणकारांनी आपल्या संपर्कातील मुलांची नावे हर्षनील प्रतिष्ठानला सुचवावीत. त्या मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांचे संपूर्ण शिक्षण पूर्ण करण्याची जबाबदारी प्रतिष्ठान स्वीकारेल. तसेच समाजातील दानशूर व्यक्ती व सेवाभावी संस्थांनी पालकत्व स्वीकारल्या जाणाऱया मुलांच्या भवितव्यांचा विचार करुन प्रतिष्ठानला आर्थिक मदत देण्यासाठी पुढाकार घ्यावा.
शशांक भागवत