स्वच्छतेची जबाबदारी स्वसाहाय्य गटांवर : प्रायोगिक तत्त्वावर काम सुरू : ओला-सुका कचरा वेगळा करणार
प्रतिनिधी /बेळगाव
ऑटोरिक्षा, बाईक, कार चालविण्याबरोबरच आज महिला विविध क्षेत्रात सरसावताना दिसत आहेत. आता स्वसाहाय्य गटाच्या माध्यमातून कचरावाहू वाहनाचे स्टेअरिंगदेखील महिलांच्या हातात येणार आहे. त्यामुळे भविष्यात कचरावाहू वाहनामध्ये ड्रायव्हर म्हणून महिला दिसणार आहेत.
राज्यातील 5844 हून अधिक ग्राम पंचायत व्याप्तीतील कचऱयाची उचल करण्यासाठी कचरा वाहने विकत घेतली आहेत. वैज्ञानिकरीत्या सुका आणि ओला कचरा वेगळा केला जाणार आहे. पाच ते आठ लाख रुपये खर्चून विकत घेतलेल्या कचरावाहू वाहनावर चालक म्हणून महिलांची नियुक्ती केली जाणार आहे.
ग्रामीण भागात कचऱयाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारने स्वच्छता मिशन योजनेंतर्गत नोंदणी झालेल्या स्वसाहाय्य गटांवर कचरा विल्हेवाट कामाची जबाबदारी सोपविली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील कचऱयाची उचल आणि व्यवस्थापन याबाबत स्वसाहाय्य गट जबाबदारी सांभाळणार आहे. संपूर्ण कचरा विल्हेवाट आणि व्यवस्थापनाच्या कामासाठी महिलांना प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी जिल्हा पंचायतमार्फत वाहन चालविणे आणि कचरा व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण दिले जात आहे.
राज्यातील प्रत्येक ग्रा. पं. व्याप्तीत तब्बल 5 ते 10 एकर क्षेत्रात कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी 20 लाख रुपये निधी खर्ची घातला जाणार आहे. विविध ठिकाणी अडीच हजारहून अधिक कचरा प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर हाती घेण्यात आले आहेत. हा प्रयोग यशस्वी होताच सर्वत्र कामाला प्रारंभ होणार आहे.
ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि प्रोत्साहन मिळावे, यासाठी हा उपक्रम हाती घेतला जाणार आहे. शिवाय सर्व जबाबदारी स्वसाहाय्य गटांवर राहणार आहे. याबाबत ग्राम पंचायत आणि स्थानिक स्वसाहाय्य महिला गटांचा समन्वय झाला आहे. याबाबत महिलांमध्ये जागृती केली जात आहे, अशी माहिती स्वच्छ भारत मिशनच्या अधिकाऱयांनी दिली आहे.
काही ठिकाणी प्रकल्प पूर्ण
बेळगाव जिल्हय़ात स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी कचरा प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. काही ठिकाणी हे प्रकल्प पूर्ण झाले आहेत. ग्राम पंचायत स्तरावर महिला स्वसाहाय्य गटांना कचरा व्यवस्थापन, वाहन चालविणे आणि स्वच्छतेची जबाबदारी दिली जाणार आहे.
– दर्शन एच. व्ही. (सीईओ जिल्हा पंचायत)









