मानहानीप्रकरणी याचिका दाखल
हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप आणि अभिनेत्री एम्बर हर्ड मागील अनेक महिन्यांपासून चर्चेत आहेत. एम्बरने पूर्वाश्रमीचा पती जॉनीवर मानहानी आणि घरगुती हिंसेचे आरोप केले होते. जॉनीनेही एम्बर विरोधात मानहानीचा दावा केला होता. परंतु न्यायालयाने याप्रकरणी जॉनीच्या बाजूने निर्णय देत नुकसान भरपाई म्हणून 15 दशलक्ष डॉलर्स देण्याचा आदेश एम्बरला दिला होता. परंतु एम्बरने या निर्णयाविरोधात पुन्हा न्यायालयात धाव घेतली आहे.
एम्बरने याप्रकरणी नव्याने सुनावणी करण्याची मागणी केली आहे. जॉनी डेपचे दावे सिद्ध करण्यासाठी ठोस पुरावे नाहीत असे म्हणत एम्बरने ज्युरींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एम्बरने याचिकेत नुकसान भरपाईची रक्कम अत्यंत अधिक असल्याचे म्हणत न्यायालयाने यावर पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यावर जॉनी डेप कामात व्यग्र झाला आहे. तो आता अनेक सोहळय़ांमध्ये सहभागी होत आहे. अलिकडेच त्याने जेफ बेकसोबत एका कार्यक्रमात भाग घेतला होता. एम्बर हर्ड देखील स्वतःच्या मित्रपरिवारासोबत दिसून आली आहे. अलिकडेच ती स्वतःच्या बहिणीसोबत एका शॉपिंग मॉलमध्ये दिसून आली होती.