अत्यंत निकृष्ट दर्जाचे खाद्य पुरविण्याचे प्रकार
प्रतिनिधी/ मडगाव
स्वंय सहाय्य गटांकडून राज्यातील अनेक शाळांनी पुरविण्यात येणारे माध्यान आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून त्यामुळे छोटय़ा विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे. शाळांच्या शिक्षकांनी भाग शिक्षणाधिकाऱयांकडे तक्रारी केल्या असल्या तरी या तक्रारीची नोंद घेतली जात नसल्याची माहिती हाती आली आहे.
फोंडा तालुक्यातील बऱयाच शाळांनी सद्या माध्यान आहार पुरविले जाते ते अत्यंत दर्जाहीन आहे. बटाटाची भाजी म्हणजे केवळ पाणी व बटाटाचे तुकडे. तेही बरोबर न शिजविलेले. बटाट भाजीला मसाला तर नाहीच, कांदा किंवा खोबरे याचा ही वापर केला जात नाही. बऱयाच वेळा चण्याची उसळ पुरविली जाते. हे चणे देखील शिजविले जात नाही. गुळ देखील दर्जाहीन वापरला जातो. उसळ सुद्धा पाण्यासारखीच असते. त्यामुळे विद्यार्थी ते खात नाही अशा शिक्षकांच्या तक्रारी आहेत.
माध्यान आहारात बऱयाचवेळा बटाट भाजी, चण्यांची उसळ, छोले व पुलाव दिला जातो. पुलाव तर त्याहून वाईट असतो. हा माध्यान आहार विद्यार्थ्यांना देण्याअगोदर तो शिक्षकांनी खाऊन बघायचा असतो. म्हणजेच टेस्ट करायचा असतो. जर तो व्यवस्थित असेल तरच विद्यार्थ्यांना द्यायचा असतो. बऱयाच शाळांनी शिक्षक तो खाऊन पहातात व नंतरच विद्यार्थ्यांना देतात. जर खराब असले तर विद्यार्थ्यांना दिला जात नाही.

उपलब्ध माहिती प्रमाणे काही शिक्षकांनी हा माध्यान आहाराची टेस्ट केली. पण, त्यातून शिक्षकांचेट पोट बिघडण्याचे प्रकार घडले आहेत. या संदर्भात शिक्षकांनी आपल्या वरिष्ठांना कल्पना दिलेली आहे. तेथून तालुक्याच्या भाग शिक्षणाधिकाऱयार्पंत तक्रारी पोचल्या आहेत. पण, या तक्रारीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही.
माध्यान आहार कसा असावा या संदर्भात परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे. पण, परिपत्रकांनूसार माध्यान आहार येत नसल्याचा तक्रारी आहेत. काही शाळांनी माध्यान आहार पुरविणाऱया स्वंय सहाय्य गटांकडे संपर्क साधून आहाराचा दर्जा चांगला ठेवण्यास सांगितले. पण, स्वंय सहाय्य गट त्याकडे दुर्लक्ष करतात.
स्वंय सहाय्य गटांना रोजगार मिळावा म्हणून सरकारने माध्यान आहार स्वंय सहाय्य गटांनी तयार करून द्यावा अशी योजना आखली. परंतु, स्वंय सहाय्य गटांकडून माध्यान आहाराच्या दर्जाकडे प्रचंड दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी आहेत. स्वंय सहाय्य गटांना दर्जासंदर्भात कल्पना दिली तरी त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने सरकारने त्वरित कारवाई करावी अशी मागणी पालकांकडून होत आहे.
भाग शिक्षणांधिकाऱयांचे का दुर्लक्ष
फोंडा तालुक्यातील अनेक शाळांनी माध्यान आहाराच्या सदंर्भातील तक्रारी भाग शिक्षणांधिकाऱयांकडे पर्यंत पोचल्या आहेत. पण, भाग शिक्षणांधिकारी या तक्रारीची दखल का घेत नाही असा सवाल उपस्थित झालेला आहे. मुलांचे आरोग्य बिघडले तरी चालेल. पण, स्वंय सहाय्य गटांवर कारवाई करायचीच नाही अशी भूमिका भाग शिक्षणांधिकाऱयांनी घेतल्याने, भाग शिक्षणांधिकाऱयांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त होत आहे. एकतर या स्वंय सहाय्य गटांना राजकीय आशीवार्द असल्याने भाग शिक्षणांधिकारी राजकीय दबावाला बळीत पडावे अशी शक्यता ही व्यक्त केली जात आहे. भाग शिक्षणांधिकाऱयांनी राजकीय दबावाला बळी न पडता मुलांचे आरोग्य जपण्याची गरज पालकांतून व्यक्त होत आहे.









