टीआरएस सरकारमधील केवळ एका मंत्र्याची हजेरी
हैदराबाद / वृत्तसंस्था
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी हैदराबादला पोहोचले. यादरम्यान तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर उपस्थित नव्हते. तेलंगणा राष्ट्र समिती सरकारमधील फक्त एक मंत्री विमानतळावर उपस्थित होता. गेल्या 6 महिन्यांत तिसऱयांदा केसीआर पंतप्रधानांच्या स्वागतासाठी पोहोचले नाहीत. यापूर्वी मे आणि फेब्रुवारीमध्येही त्यांनी पंतप्रधान मोदींच्या स्वागताला विमानतळावर उपस्थित राहण्यास टाळाटाळ केली होती. दुसरीकडे, पंतप्रधानांच्या आगमनाच्या काही तासांपूर्वी तेथे पोहोचलेले विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचे स्वागत करण्यासाठी ते संपूर्ण मंत्रिमंडळासह हैदराबादच्या बेगमपेट विमानतळावर पोहोचल्याचे स्पष्ट झाल्यामुळे सध्या केसीआर यांच्यावर विरोधी नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे.
18 जुलै रोजी होणाऱया राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राव यांनी सिन्हा यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आमदारांचा पाठिंबा घेण्यासाठी यशवंत सिन्हा हैदराबादला पोहोचले आहेत. हैदराबादमध्ये होणाऱया भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उत्तर देण्यासाठी टीआरएसने सिन्हा यांच्या समर्थनार्थ बाईक रॅली काढली. विमानतळ ते जलविहार या रॅलीत सिन्हा आणि केसीआर सहभागी झाले होते. सिन्हा यांच्या समर्थनार्थ टीआरएसने जलविहारमध्ये सभा घेतली होती. शहरातील रस्त्यांवर दोन्ही पक्षांमध्ये पोस्टरयुद्धही झळकले होते.









