ऑनलाईन टीम/तरुण भारत
एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) बंडानंतर महाराष्ट्रात सत्तापालट झाली असून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis)यांनी उपमुख्यमंत्री झाले आहेत. रविवारी आणि सोमवारी दोन दिवस विशेष अधिवेशन होणार आहे. यावेळी बहुमत चाचणी बरोबरच विधानसभा अध्यक्षांची निवडणूकही होणार आहे. भाजपचकडून आमदार राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांना विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, उद्या होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (Assembly Speaker Election) शिवसेनेकडून व्हीप जारी करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गट काय भूमिका घेणार यावर निकाल अवलंबून असणार आहे.
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात शिवसेनेकडूनही उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने कोकणातील राजापूर मतदार संघातील आमदार राजन साळवी यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे उद्या होणाऱ्या विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) आणि राजन साळवी यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे आता शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी शिवसेनेतील विधानसभेच्या सदस्यांसाठी व्हीप जारी केला आहे. तसचे त्यांनी संपूर्ण वेळ विधानसभा सभागृहात उपस्थित राहून राजन साळवी यांनाच मतदान करावे, असा पक्षादेश काढण्यात आला आहे. त्यासंदर्भातील पत्र सुद्दा जारी करत सर्व आमदारांना निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता शिंदे गटाची यावर कोणती भूमिका असणार, हे पाहणं महत्त्वाचं आहे.