ऑनलाईन टीम / तरुण भारत :
विधानसभा अध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. साळवी हे शिवसेनेचे उपनेते आणि रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर मतदारसंघाचे आमदार आहेत. विधानसभा अध्यक्षपदासाठी साळवी यांची भाजपचे राहुल नार्वेकर यांच्याविरुद्ध थेट लढत होणार आहे.
मागच्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. या जागेसाठी भाजपकडून राधाकृष्ण विखे-पाटील यांचे नाव चर्चेत होते. पण, भाजपने ऐनवेळी धक्कातंत्राचा वापर करत राहुल नार्वेकर यांना उमेदवारी दिली. नार्वेकर यांनी अर्जही दाखल केला. तरीही महाविकास आघाडीकडून शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार ठरलेला नव्हता. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचा अर्धा तास उरला असताना महाविकास आघाडीची बैठक झाली. या बैठकीत अखेर राजन साळवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर लगेचच मविआ नेत्यांच्या उपस्थितीत साळवींचा अर्ज दाखल करण्यात आला.
नवीन सरकारच्या बहुमत चाचणीसाठी 3 आणि 4 जुलैला विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीपूर्वी उद्या विधानसभेचा अध्यक्ष ठरवला जाणार आहे. अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत साळवी आणि नार्वेकर यांच्यात अटीतटीची लढत होणार असल्याचे सांगण्यात येते.