जनतेने सहकार्य केल्यास शिवोलीत साधनसुविधा उपलब्ध : आ. मायकल लोबो
वार्ताहर /शिवोली
निवडणूक काळात आपण शिवोलीवासियांनी अनेक आश्वासने दिली होती. शिवोलीच्या काही भागात विकास कामे झालेली आहेत. शिवोलीती जनतेने सहकार्य केल्यास येणाऱया पाच वर्षात शिवोली मतदारसंघात विविध साधनसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे प्रतिपादन कळंगुटचे आमदार तथा विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी केले.
मार्ना पंचायत सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार डिलायला लोबो, फादर सुकुर मेंडिस, उपसरपंच विलियम फर्नांडीस, पंच सदस्य फेर्मिना फर्नांडिस, शोनाली आगरवाडेकर, प्रेडी फर्नांडीस, सिल्वेस्टर फर्नांडीस, सडये माजी सरपंच निलेश वायंगणकर, पंच सदस्य अँन्थनी डिसोझा, ऍड. रोशन चोडणकर व इतर मान्यवर उपस्थित होते. आमदार मायकल लोबो पुढे म्हणाले, या परिसरातील महिलांना कोणताही कार्यक्रम करायचा असल्यास सभागृह उपलब्ध नव्हता. त्यामुळे पंचायत जवळच असलेल्या जागेत सभागृह बांधून देण्याचे आश्वासन निवडणुकीपूर्वी आपण दिले होते. येत्या काही दिवसात पंचायत सभागृहाच्या दुसऱया मजल्यावर सभागृह बांधून दिला जाईल. तेथे ग्रामसभा घेता येईल, असे मायकल लोबो म्हणाले.
महिलांना विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर या महिलांना स्वतः तयार केलेल्या वस्तू विक्री करण्यास जागा उपलब्ध करून दिली जाईल. सेंट अँन्थनी चर्च मैदानाचे नूतनीकरण करण्याबाबत चर्चच्या व्यवस्थापन मंडळाशी बोलणी चालू आहे. सरकारी मदतीवर अवलंबून न राहता स्थानिकांनी मदत केल्यास येथील मैदानावर हिरवागार साज चढविणे सहज शक्मय असल्याचे मायकल लोबो म्हणाले. महिलांच्या उत्कर्षासाठी नेहमीच कार्यरत राहणार असल्याचे लोबो यांनी स्पष्ट केले. शोनाली आगरवाडेकर यांनी आभार मानले.









