कचरावाहू वाहनांद्वारे करण्यात येणार होती जागृती मोहीम, वाहनेच बंद ठेवल्याने निराशा
प्रतिनिधी /बेळगाव
देशातील प्लास्टिक हद्दपार करण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली आहे. त्यानुसार शुक्रवारपासून प्लास्टिक बंदीच्या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला असून प्लास्टिकचा वापर टाळावा, अशी सूचना बाजारपेठेतील व्यावसायिकांना केली जात आहे. मात्र हंगामी स्वच्छता कामगारांच्या आंदोलनामुळे जागृती मोहिमेस फटका बसला.
महापालिकेच्यावतीने प्लास्टिक बंदीच्या कारवाईसाठी जागृती मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत बाजारपेठेतील प्रत्येक व्यावसायिकाला वैयक्तिकरित्या सूचना देण्यात येत आहे. घरोघरी जाऊन कचऱयाची उचल करण्यात येत असल्याने या वाहनाद्वारे जागृती मोहीम राबविण्यास प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी केवळ जागृती मोहीम
हाती घेण्यात आली होती. पण स्वच्छता कामगारांनी कामबंद आंदोलन छेडल्याने शहराच्या कानाकोपऱयातील नागरिकांपर्यंत पोहोचता आले नाही. केवळ महापालिकेच्या कचरावाहू ई-रिक्षाद्वारे नागरिकांना आवाहन करण्यात
आले.
प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा, अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी सूचना करून पर्यायी साधनांचा वापर करण्याचे आवाहन स्पीकरद्वारे करण्यात येत आहे. केवळ महापालिकेचे कायमस्वरुपी कर्मचारी शुक्रवारी कार्यरत होते. हंगामी कामगारांनी कामबंद आंदोलन छेडले होते. त्यामुळे प्लास्टिक बंदीच्या जागृती मोहिमेस कामगारांच्या कामबंद आंदोलनाचा फटका बसला.कचरा जमा करणाऱया वाहनावरील स्पीकरद्वारे प्लास्टिक बंदीबाबत जागृती मोहीम राबविण्याची तयारी महापालिकेने केली होती.
आजपासून जागृतीला येणार वेग…
शहरातील 48 वॉर्डांमध्ये हंगामी तत्त्वावरील वाहनांद्वारे कचरा जमा केला जातो. पण ही वाहने शुक्रवारी बंद ठेवण्यात आली होती. परिणामी स्पीकरद्वारे प्लास्टिक बंदी जागृती करता आली नाही. मात्र कायमस्वरुपी कर्मचारी आणि स्वच्छता निरीक्षकांनी महापालिकेच्या वाहनाद्वारे विविध ठिकाणी व्यावसायिकांना सूचना केल्या. शनिवारपासून प्लास्टिक बंदीच्या जागृती मोहिमेस वेग येण्याची शक्मयता आहे.









