जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते उद्घाटन : विविध फळ-पुष्परोपांच्या खरेदीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रतिनिधी /बेळगाव
फल-पुष्पप्रेमींना प्रोत्साहन देण्यासाठी बागायत खात्यामार्फत रोप बाजार भरविण्यात आला आहे. शुक्रवारी जिल्हाधिकारी नितेश पाटील, आमदार अनिल बेनके, बागायत खात्याचे जिल्हा उपनिर्देशक महांतेश मुरगोड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत रोप बाजाराचे उद्घाटन झाले. या बाजारात विविध फळ आणि फुलांची रोपे विक्रीसाठी ठेवण्यात आली असून पहिल्या दिवशीच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिवाय पुढील तीन दिवस हा बाजार चालणार आहे.
दरवषी बागायत खात्यामार्फत पावसाळय़ाच्या तोंडावर रोप बाजाराचे आयोजन केले जाते. मागील दोन वर्षात कोरोनामुळे रोप बाजाराला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता. मात्र यंदा विविध रोपे खरेदीसाठी नागरिकांचा ओढा वाढला आहे. काजू, फणस, पेरू, लिंबू, कडीपत्ता, नारळ, चिकू, सीताफळ, आंबा यासह गुलाब, मोगरा, झेंडू, जास्वंदी, कुट्रॉन्स आदी रंगीबेरंगी फुलांची रोपटी उपलब्ध आहेत. याबरोबरच घरामध्ये ठेवली जाणारी शोभिवंत रोपटी देखील आकर्षित करत आहेत.
याबरोबरच निरुद्योगी नागरिकांना घरच्या घरी व्यवसाय करता यावा, यासाठी अळंबी आणि मधाचे उत्पादन कसे करावे, याबाबतही माहिती दिली जात आहे. शिवाय अळंबी बियाणे आणि मधाची विक्रीदेखील केली जात आहे. याबरोबरच टोमॅटो, मिरची आणि इतर भाज्यांची रोपेदेखील उपलब्ध आहेत. परस बाग सजविण्यासाठी विविध फळ-पुष्पांची रोपे एकाच छताखाली उपलब्ध असल्याने नागरिकांचा कल वाढला आहे. शिवाय सेंद्रिय खते देखील ठेवण्यात आली आहेत.
फळ-पुष्प प्रेमींना रोप बाजार पर्वणीच
रोप बाजारात विविध जातीची रोपे उपलब्ध करण्यात आली आहेत. सवलतीच्या दरात फळ आणि फुलांच्या रोपटय़ांची विक्री होत आहे. पहिल्या दिवशी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. रविवारपर्यंत हा रोप बाजार चालणार आहे. फळ-पुष्प प्रेमींना हा रोप बाजार पर्वणीच आहे.
– महांतेश मुरगोड (उपनिर्देशक, बागायत खाते)









