नदाल, किर्गीओस, हॅलेप, ऍनिसिमोव्हा यांचीही आगेकूच, प्लिस्कोव्हा, शॅपोव्हॅलोव्ह स्पर्धेबाहेर
वृत्तसंस्था/ लंडन
स्पेनचा राफेल नदाल, ऑस्ट्रेलियाचा निक किर्गीओस, ब्रँडन नाकाशिमा, ब्रिटनची केटी बोल्टर, पोलंडची इगा स्वायटेक, रोमानियाची सिमोना हॅलेप, अमेरिकेची कोको गॉफ, अमांदा ऍनिसिमोव्हा यांनी विम्बल्डन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या तिसऱया फेरीत प्रवेश मिळविला तर डेनिस शॅपोव्हॅलोव्ह, कॅरोलिना प्लिस्कोव्हा यांचे आव्हान समाप्त झाले. शुक्रवारी झालेल्या लढतीत जागतिक द्वितीय मानांकित ऑन्स जेबॉर, ब्रिटनची हीदर वॅटसन, अमेरिकेचा फ्रान्सेस टायफो यांनी चौथी फेरी गाठली आहे.

शुक्रवारी झालेल्या तिसऱया फेरीच्या लढतीत महिलांमधील जागतिक दुसरी मानांकित टय़ुनिशियाच्या ऑन्स जेबॉरने चौथी फेरी गाठताना डायने पॅरीचा 6-2, 6-3 असा पराभव केला. अँजेलिक केर्बर किंवा एलिस मर्टेन्स यापैकी एकीशी तिची पुढील लढत होईल. ब्रिटनच्या वॅटसनने 43 व्या प्रयत्नात प्रथमच ग्रँडस्लॅमची चौथी फेरी गाठली. तिने स्लोव्हेनियाच्या काया जुव्हानवर 7-6 (8-6), 6-2 अशी मात केली. पुरुष एकेरीत 23 व्या मानांकित फ्रान्सेस टायफोने कझाकच्या अलेक्झांडर बुबलिकचा 3-6, 7-6 (7-1), 7-6 (7-3), 6-4 असा पराभव करून चौथ्या फेरीत स्थान मिळविले.
नाकाशिमाचा शॅपोव्हॅलोव्हला धक्का
दोन वेळा ही स्पर्धा जिंकणाऱया द्वितीय मानांकित नदालने तिसरी फेरी गाठताना लिथुआनियाच्या रिकार्डस बेरान्किसचा 6-4, 6-4, 4-6, 6-3 असा पराभव केला. तीन तास ही लढत रंगली होती. नदालची पुढील लढत 27 व्या मानांकित लॉरेन्झो सोनेगोविरुद्ध होणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या किर्गीओसने फिलिप क्रायनोविकचा 6-2, 6-3, 6-1 असा पराभव करून सहाव्यांदा तिसरी फेरी गाठली. पुरुष एकेरीच्या अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या 20 वर्षीय ब्रँडन नाकाशिमाने मागील वर्षी उपांत्य फेरी गाठलेल्या कॅनडाच्या डेनिस शॅपोव्हॅलोव्हचे आव्हान 6-2, 4-6, 6-1, 7-6 (8-6) असे संपुष्टात आणले. या स्पर्धेत तिसरी फेरी गाठणारा अमेरिकेचा तो सातवा खेळाडू आहे. मॅक्झिम क्रेसी व जॅक सॉक यापैकी एकजण तिसरी फेरी गाठणार असल्याने आठवा खेळाडूही निश्चित झाला आहे. टेलर फ्रिट्झ, जॉन इस्नेर, जेन्सन ब्रूक्सबी, टॉमी पॉल, स्टीव्ह जॉन्सन, फ्रान्सेस टायफो हे तिसरी फेरी गाठणारे अन्य अमेरिकन खेळाडू आहेत. 1996 नंतर प्रथमच अमेरिकेच्या सर्वाधिक खेळाडूंनी हा टप्पा गाठला आहे.
केटी बोल्टरकडून प्लिस्कोव्हा चकित
महिला एकेरीत ग्रेट ब्रिटनच्या केटी बोल्टरने एका सेटची पिछाडी भरून काढत मागील उपविजेत्या सहाव्या मानांकित कॅरोलिना प्लिस्कोव्हाला पराभवाचा धक्का दिला. दोन आठवडय़ात केटीचा हा प्लिस्कोव्हावरील दुसरा विजय आहे. तिने येथील सामना 3-6, 7-6 (7-4), 6-4 असा जिंकून पहिल्यांदाच तिसरी फेरी गाठली. पहिल्या सेटमध्ये 2-0 अशा आघाडीनंतर केटीने सलग सातपैकी सहा गेम्स गमविले. ही लढत सुमारे दोन तास चालली होती. जागतिक अग्रमानांकित इगा स्वायटेकने हॉलंडच्या लेस्ली केरखोव्हचा 6-4, 4-6, 6-3 तर 2019 ची चॅम्पियन सिमोना हॅलेपने बेल्जियमच्या कर्स्टन फ्लिपकेन्सचा 7-5, 6-4 असा पराभव केला. हॅलेपची पुढील लढत मॅग्डालेना प्रेचशी होईल. बार्बोरा क्रेसिकोव्हानेही तिसरी फेरी गाठताना स्वित्झर्लंडच्या व्हिक्टोरिया गोलुबिकवर 6-3, 6-4 अशी मात केली.
गॉफची सर्वात वेगवान सर्व्हिस
अमेरिकेची युवा खेळाडू कोको गॉफने रोमानियाच्या मिहीला बुझारनेस्क्यूवर 6-2, 6-3 अशी सहज मात केली. या लढतीच्या दुसऱया सेटवेळी गॉफने 124 मैल प्रतितास वेगवान सर्व्हिस केली. महिला टेनिसमधील ही सर्वात वेगवान सर्व्हिस आहे. तिचीच देशवासी 20 व्या मानांकित अमांदा ऍनिसिमोव्हाशी तिची पुढील लढत होईल. ऍनिसिमोव्हाने अमेरिकेच्याच लॉरेन डेव्हिसवर 2-6, 6-3, 6-4 अशी मात करून आगेकूच केली आहे. अन्य एका सामन्यात फ्रान्सच्या ऍलिझ कॉर्नेटने अमेरिकेच्या क्लेअर लियूचा 6-3, 6-3 असा पराभव केला. तिसऱया फेरीत तिची गाठ स्वायटेकशी पडेल.









