नवी दिल्ली / वृत्तसंस्था
तिहार कारागृहात कैदी आणि तुरुंग कर्मचाऱयांमध्ये हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी उजेडात आली. या हाणामारीत 16 कैदी आणि 7 तुरुंग कर्मचारी जखमी झाले. दिल्ली कारागृह विभागाने शुक्रवारी या घटनेबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. कारागृहातील विविध बराकींमध्ये बुधवारी नियमित शोध सुरू असताना काही कैद्यांनी तुरुंग अधिकाऱयांच्या टीमला थांबवून शिवीगाळ केली. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी झाल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. तपासणीदरम्यान आपल्यावर कारवाई होण्याच्या भीतीने एका कैद्याने स्वतःच भिंतीवर डोके आपटून घेतले. तसेच धारदार वस्तूने स्वतःला जखमी केले. त्यानंतर अधिकाऱयांनी अधिक कसून चौकशी सुरू केल्यानंतर हाणामारीची घटना घडली. या घटनेत 16 कैदी जखमी झाले असून चौघांवर इस्पितळात उपचार करण्यात आले.









