ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात रेल्वे बांधकाम शिबिराजवळ मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले आहे. या घटनेत सात जणांचा मृत्यु झाला असून 13 जण जखमी झाले आहेत, तर सुमारे 23 बेपत्ता आहेत, असे बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास मखूम परिसरात असलेल्या तुपुल यार्ड रेल्वे कन्स्ट्रक्शन कॅम्पजवळ भूस्खलन झाल्याची घटना घडली. “आम्ही आतापर्यंत सात मृतदेह बाहेर काढले असून 13 जखमींना वाचवले आहे.” शोध आणि बचाव कार्य करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितले आहे.
तर अजूनही अंदाजे 23 लोक अद्याप बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बेपत्ता लोकांची युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू आहे. तामेंगलाँग आणि नोनी जिल्ह्यातून वाहणाऱ्या इजाई नदीला मातीच्या ढिगाऱ्यांमुळे अडथळा निर्माण होऊन धरणासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे या शोधमोहिमेमध्ये अडथळा निर्माण झाला आहे.