नैर्त्रुत्य रेल्वेकडून अद्याप एकही विशेष रेल्वे नाही : आषाढीसाठी वारकऱयांची पायपीट सुरूच
प्रतिनिधी /बेळगाव
मध्य रेल्वेने आषाढी एकादशीनिमित्त पुणे, नागपूर, मुंबई व इतर भागातून विशेष रेल्वे सुरू केल्या. परंतु नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी विभागाकडून अद्यापही वारकऱयांच्या मागणीला कोणताच प्रतिसाद मिळालेला नसल्याने विठ्ठल भक्तांच्या पदरी निराशा पडली आहे. त्यामुळे एकमेव असणाऱया बेंगळूर-पंढरपूर या साप्ताहिक एक्स्प्रेससाठी वारकऱयांची पायपीट सुरू आहे.
महाराष्ट्रासोबतच गोवा व कर्नाटकातही लाखो विठ्ठलभक्त आहेत. मागील दोन वर्षात कोरोनामुळे निर्बंधांमध्ये आषाढी एकादशी साजरी झाली. परंतु यावषी सर्व निर्बंध शिथिल झाल्यामुळे लाखेंच्या संख्येने वारकरी विठुरायाच्या पंढरीत जमा होणार आहेत. परंतु त्यांना ये-जा करण्यासाठी हुबळी-बेळगाव परिसरातून रेल्वे उपलब्ध नसल्याने वारकऱयांची गैरसोय होत आहे. सध्या पुणे येथून वारीला सुरुवात झाली असून बेळगावमधील वारकरी आपल्याला शक्मय होईल तसे वारीमध्ये सहभागी होतात. काही वारकरी आषाढीपूर्वी दोन दिवस पंढरपूरमध्ये दाखल होतात.
कोरोनापूर्वी बेळगावमधून दोन रेल्वे दररोज पंढरपूरला जात होत्या. दोन रेल्वे उपलब्ध असल्यामुळे प्रवाशांना अत्यंत माफक दरात विठुरायाचे दर्शन घेता येत होते. परंतु सध्या रेल्वे उपलब्ध नसल्याने मिळेल त्या बसने प्रवास करत पंढरपूर गाठावे लागत आहे. सध्या यशवंतपूर-पंढरपूर ही साप्ताहिक एक्स्पेस पंढरपूरला जाण्यासाठी उपलब्ध आहे. गुरुवारी सायं. 6.15 वा. यशवंतपूर येथून निघालेली एक्स्प्रेस शुक्रवारी पहाटे 5.15 वा. बेळगावला पोहोचते तर 11.25 वा. पंढरपूरला जाते. तर पंढरपूर-यशवंतपूर एक्स्प्रेस दुपारी 1.35 वा. पंढरपूर येथून निघून सायंकाळी 6.55 वा. बेळगावला तर दुसऱया दिवशी पहाटे 5.45 वा. यशवंतपूर येथे पोहोचते.
तिकीट मिळविण्यासाठी तारेवरची कसरत
रेल्वेचा प्रवास सुरक्षित व आर्थिकदृष्टय़ा परवडणारा असल्याने प्रवासी रेल्वेला पहिली पसंती देतात. सध्या पंढरपूरला जाण्यासाठी एकच एक्स्प्रेस उपलब्ध असल्याने त्या एक्स्प्रेसचे तिकीट मिळविण्यासाठी वारकऱयांची कसरत सुरू आहे. त्यामुळे आषाढीच्या काळात तरी विशेष रेल्वे सुरू करावी, अशी मागणी होत आहे.









