महापालिकेने खर्ची घातलेली रक्कम वाया गेल्याची टीका : प्रायोगिक तत्त्वावर मशीनचा वापर
प्रतिनिधी /बेळगाव
ओला आणि सुका कचरा विघटन करून कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने विविध उपक्रम हाती घेतले होते. या अंतर्गत ओल्या कचऱयापासून खत निर्माण करण्यासाठी खरेदी करण्यात आलेली मशीन धूळखात पडली आहे. त्यामुळे महापालिकेने खर्ची घातलेली रक्कम वाया गेली असल्याची टीका होत आहे.
शहरातील कचऱयाचे प्रमाण वाढले असून रोज 250 ते 280 टन कचरा जमा होत आहे. यामध्ये सुक्मया कचऱयाचे प्रमाणही मोठय़ा प्रमाणात आहे. त्यामुळे सुका आणि ओला कचरा वेगवेगळा घेऊन सुक्मया कचऱयाचा फेरविनियोग करण्यासाठी काही कंपन्यांना परवाना दिला जातो. तर ओला कचरा तुरमुरी डेपोमध्ये खत निर्माण करण्यासाठी पाठविला जातो. पण कचऱयाची क्षमता वाढत चालल्याने कचऱयावर प्रक्रिया करण्याच्या खर्चाचा बोजा वाढत आहे. त्यामुळे ओला व सुका कचरा वेगवेगळा जमा करून सुका कचरा काही सिमेंट कंपन्यांना दिला जात आहे. तर वॉर्डमध्ये जमा होणाऱया ओल्या कचऱयापासून खत निर्मिती करण्यासाठी महापालिकेने प्रयत्न केले होते. श्रीनगर येथील गो-शाळेमध्ये हा उपक्रम हाती घेतला होता.
अनावश्यक यंत्रोपकरणे खरेदी करण्याचा उद्देश काय?
महापालिकेचा निधी खर्च करून दीड लाखाची मशीन खत निर्माण करण्यासाठी खरेदी करण्यात आली होती. या मशीनमध्ये सर्व ओला कचरा घातल्यानंतर त्याचा बारीक चुरा होऊन येत होता. सदर चुरा जमा करून त्यापासून खत निर्माण करण्यात येत होते. प्रायोगिक तत्त्वावर ही मशीन खरेदी करण्यात आली होती. केवळ प्रायोगिक तत्वावर या मशीनचा वापर करण्यात आला. त्यानंतर ही मशीन श्रीनगर येथील गो-शाळेत धूळखात पडली
आहे.
या मशीनचा वापर केला जात नाही. त्यामुळे मशीन खरेदी करण्यासाठी खर्च करण्यात आलेला निधी वाया गेला असल्याची टीका होत आहे. या मशीनचा वापर कधी होणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असून अनावश्यक यंत्रोपकरणे खरेदी करण्याचा उद्देश काय? असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.









