तुरंबे/प्रतिनिधी
नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे मात्र विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी लागणारे उत्पन्न, डोमेसाईल, नॉन क्रीमीलेयर आणि इतर दाखले मिळवण्यास तांत्रिक कारणामुळे विलंब होत आहे. महा आयटीच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने राधानगरी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात दाखले प्रलंबित आहेत. तालुक्यातील महा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्राची सेवा ही तीन दिवसापासून ठप्प झाली आहे. परिणामी केंद्र चालक आणि पालकांच्यात वादावादीचे प्रकारही होत आहेत. आता सर्वांचेच डोळे सर्व्हर कधी चालू होणार याकडे लागले आहेत.
राधानगरी तालुक्यातीलमहा ई-सेवा केंद्र, आपले सरकार सेवा केंद्राचे कामकाज गेल्या तीन दिवसांपासून ठप्प झाले आहे. महा आयटीचा गेल्या आठ दिवसापासून सर्व्हर सतत चालू बंद होत आहे. परिणामी दाखले ऑनलाईन पास होत नाहीत. दहावी आणि बारावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी लागणारे उत्पन्न, डोमेसाईल, नॉन क्रीमीलेयर, जातीचे आणि इतर दाखले प्रवेशाच्या वेळी देणे बंधनकारक आहे. मात्र सतत सर्व्हरमध्ये बिघाड होत असल्याने राधानगरी तालुक्यातील मोठ्या प्रमाणात दाखले प्रलंबित आहेत. विद्यार्थी आणि पालक दाखल्यांसाठी महा ई सेवा केंद्राकडे धाव घेताना दिसत आहेत. मात्र ऑनलाईन दाखले पुढे जात नसल्यामुळे प्रलंबित दाखल्यांची संख्या वाढत आहे.
शाळेत दाखले घेतल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही असे विद्यार्थी सांगतात. यामुळे प्रवेशाची तारीख वाढवून मिळावी आणि बंद असलेला सर्व्हर तात्काळ सुरु करावा अशी मागणी विद्यार्थी वर्गातून होत आहे. यासंदर्भात तहसिलदार मीना निंबाळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शैक्षणिक दाखले देण्याचे काम सुरु आहे. तसेच सुट्टीच्या दिवशी सुद्धा महसूल कर्मचारी काम करत आहेत. मात्र तांत्रिक बिघाडामुळे अनेक अडचणी येत आहेत. सर्व्हर सुरु करण्यासाठी मह ऑनलाईनशी पत्रव्यवहार केला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.