अनेक गावांमध्ये घुमू लागलाय विठू नामाचा गजर : वारकऱयांना लागली सावळय़ा विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ
वार्ताहर /किणये
पंढरीची वारी आहे माझ्या घरी ।
आणिक न करी तिर्थव्रत ।।
व्रत एकादशी करीत उपवाशी ।
गाईन अहर्निशी मुखी नाम ।।
नाम विठोबाचे घेईन मी वाचे ।
बीज कल्पांतीचे तुका म्हणे ।।
संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणे तालुक्यातील लाखो वारकऱयांच्या घराण्यात पंढरपूरच्या वारीची परंपरा अखंडपणे सुरू आहे. वारीचे व्रत केल्याने आम्ही इतर व्रत करत नाही, एकादशीचा उपवास अगत्याने करतात. वारीची वाटचाल करून सावळय़ा विठोबाचे दर्शन घेतात.
कोरोनामुळे गेल्या तीन वर्षांपासून तालुक्यातून पायी दिंडय़ा पंढरपूरला गेल्या नाहीत. दिंडय़ा न जाण्याचे शासनाचे आदेश होते. यामुळे विठ्ठलाच्या भक्तांची मात्र घालमेल सुरू होती. मध्यंतरीच्या काळात काही वारकरी पंढरपूरला रेल्वेद्वारे जाऊन विठ्ठलाचे मुख दर्शन घेतात. मात्र पायी दिंडी करून विठ्ठलाचे दर्शन घेतल्यास जीवनाचे सार्थक होते, असा भाव भक्तांचा आहे. त्यामुळे कधी एकदा दिंडय़ांना सुरुवात होते, अशी उत्सुकता साऱयांनाच लागून राहिली होती.
माझे जीविची आवडी, पंढरपुरा ।
नेईत गुठी ।।
असे म्हणत गेल्या दोन-तीन दिवसापासून तालुक्याच्या विविध गावांमधून पायी दिंडय़ांचे प्रस्थान होतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे. दिंडीचे प्रस्थान होण्यापूर्वी गावचे ग्रामदैवत, विठ्ठल-रखुमाई मंदिर येथून आरती करून, बोला पुंडलिक वरदे हरी, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय असे म्हणत टाळ-मृदंगाच्या गजरात गावभर या दिंडय़ा मिरवत आहेत व त्यानंतर मुख्य रस्त्यावरून पंढरपूरला रवाना होत आहेत. यामुळे गावा-गावांमध्ये विठू नामाचा गजर होऊ लागला आहे.
तालुक्यात अलीकडे वारकऱयांची संख्या वाढली आहे. आषाढी एकादशी अवघ्या बारा दिवसांवर येऊन ठेपली असल्याने विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागून राहिली आहे. कणबर्गी येथील हरिभक्त सांप्रदायिक भजनी मंडळ व ग्रामस्थ यांच्यावतीने आषाढी वारी पायी दिंडी सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले असून मंगळवार दि. 28 रोजी कणबर्गी ते पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान झाले आहे. कणबर्गी येथील विठ्ठल-रखुमाई मंदिर येथून दिंडीला सुरुवात झाली. मंगळवारी दुपारी दिंडीचे उद्घाटन बसवराज यळ्ळूरकर, नागराज जाधव (तुरमुरी) आदींच्या हस्ते केले.
दिंडीचे यंदाचे 23 वे वर्ष असून वारकऱयांमध्ये उत्साह दिसून येत आहे. दिंडी उद्घाटनप्रसंगी आप्पाजी सुंठकर, परशराम अष्टेकर, धोंडिबा मुतगेकर, मारुती मुचंडीकर, बसवाणी भंडरगाळी, अप्पय्या गोवेकर, कल्लाप्पा सुंठकर आदी उपस्थित होते.
कलखांब, मुचंडी, अष्टे मार्गे दिंडी निघाली. मंगळवारी दिंडीचा पहिला मुक्काम खणगाव येथील बसवाण्णा मंदिर येथे झाला.
9 जुलै रोजी पंढरपूरला पोहोचणार
बुधवारी पाच्छापूर येथे मुक्काम होणार आहे. त्यानंतर मेलमट्टी, अरभावी, मुगुळकोड, शंकरहट्टी, पार्थनहळ्ळी, बसीरगी, जत, सोनंद, मांजरी येथे मुक्काम होणार आहे. दिंडी दि. 9 जुलै रोजी पंढरपूरला पोहोचणार त्यानंतर एकादशी व द्वादशीच्या दिवशी दिंडी पंढरपुरात मुक्काम करणार आहे.









